पश्चिम महाराष्ट्रात ‘हात’ का बदला हालात
तीन खासदारांमुळे नवसंजीवनी, युवा नेतृत्वाचा डंका
गुरुबाळ माळी, कोल्हापूर
लढायला संधी नाही, मिळाली तेथे सलग दोनदा पराभव, अनेकांनी साथ सोडून भाजपमध्ये केलेला प्रवेश यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची हालात फारच बिघडली होती. पण, या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने ‘हात का बदला हालात’ अशी स्थिती झाली. यामुळे पक्षाला मोठी नवसंजीवनी मिळाली आहे. या निमित्ताने आमदार सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे आणि खासदार विशाल पाटील यांच्या रूपाने युवा नेतृत्वाचा डंकाच वाजणार असल्याने पक्षाचे हात आणखी बळकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कोल्हापूरातून शाहू महाराज, सांगलीतून विशाल पाटील आणि सोलापुरातून प्रणिती शिंदे निवडून आल्या. महाराज व शिंदे हाताच्या चिन्हावर निवडून आले. विशाल पाटील यांनी बंडखोरी केली, निवडून येताच ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तीन खासदार पक्षाला मिळाल्याने ताकद वाढली आहे. कोल्हापुरात तब्बल २५ वर्षे पक्षाला लढायला संधी मिळत नव्हती. प्रत्येकवेळी राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार करण्याची वेळ या पक्षावर आली. तेथेही दोन वेळा पराभव झाला. सांगली आणि सोलापुरात सलग दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला. सोलापुरात सुशिलकुमार शिंदे सारख्या दिग्गज नेत्याचा आणि सांगलीत वसंतदादा घराण्याचा पराभव जिव्हारी लागणाराच होता.
दहा वर्षात आमदार प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक यांच्यासह अनेक नेत्यांनी ‘हाता’ची साथ सोडली. यामध्ये दुसऱ्या फळीतील नेतेही भरपूर होते. सततचा पराभव, लढायला संधी नाही, स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात नाहीत अशामुळे या पक्षाची अवस्था बिकट झाली. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीला सामारे गेलेल्या काँग्रेसला जे मोठे यश मिळाले आहे, ते निश्चितच हात आणखी मजबूत करायला उपयोगी पडणारे आहे.
लोकसभेच्या निमित्ताने कोल्हापुरात शाहू महाराजांसारखा चेहरा पक्षाला मिळाला. विशाल पाटील यांच्या उमेदवारीबाबत सोबत असलेल्या पक्षांनी घोळ घातला. पण, जनतेने अशा नेत्यांना जमीनीवर आणले. ‘विशाल’ विजयाने पक्षाची आणि आमदार विश्वजित कदम यांचीही ताकद मिळाली. आता विशाल पाटील काँग्रेसचे सहयोगी सदस्य झाले आहेत. प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून दिल्लीत युवा नेतृत्व पोहोचले आहे. कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेस आणखी मजबूत झाला. पाच आमदार आणि एक खासदार करत त्यांचे नतृत्व अधिक झळकले आहे.
लोकसभेच्या निमित्ताने सतेज, विश्वजित, विशाल आणि प्रणिती या चार युवा नेतृत्वाचा डंका वाजला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मिळालेले यश काँग्रेसला आणखी ताकद देणारे ठरणार आहे. ढासळलेला बालेकिल्ला पुन्हा बळकट करण्याची संधीच यामुळे मिळणार असल्याने पक्षात नवा उत्साह आला आहे.