आम्हाला संघर्ष नवा नाही, मैदानात उतरणारच…  मंडलिक कडाडले

Spread the news

आम्हाला संघर्ष नवा नाही, मैदानात उतरणारच…  मंडलिक कडाडले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आतापर्यंत आम्हाला संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळाले नाही, संघर्ष करूनच राजकीय कुस्ती जिंकलेली आहे, आताही लोकसभेच्या मैदानात उतरणार आणि मैदान मारणारही अशा शब्दात खासदार संजय मंडलिक यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.  मंडलिकांना उमेदवारी देऊ नका अशी मागणी करणाऱ्या संग्राम कुपेकरांना टोला मारताना अडीच वर्षात ते कामासाठी माझ्याकडे आलेच नाही असे स्पष्ट केले.

सोमवारी कागल तालुक्यातील बिद्री एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडलिक गेले होते. याचवेळी तेथे शाहू ग्रुपचे समरजित घाटगेही पोहोचले. यावेळी दोघात बराच वेळ निवडणुकीची चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार मंडलिक म्हणाले, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सर्व तेरा खासदारांची उमेदवारी निश्चित आहे. तसा शब्दच गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार हे नक्की असल्याने कार्यकर्ते प्रचारालाही लागले आहेत. आता काहीही झाले तरी माघार नाही असे सांगून ते म्हणाले, आतापर्यंत मंडलिक घराण्याला संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळाले नाही. हा आमचा इतिहास आहे. संघर्ष हा आमच्या रक्तातच आहे. निवडणुकीचे मैदान आम्हाला नवीन नाही. आतापर्यंत अनेक ठिकाणी मैदानात उतरलो आणि जिंकलोही. लोकसभेतही हेच होईल. मी लढणार आणि जिंकणारही.

कुपेकर यांच्या आरोपावर बोलताना ते म्हणाले, आम्ही महायुतीत एकत्र आल्यापासून ते कधीच कोणत्या कामासाठी आपल्याला भेटले नाहीत. त्यांनी आरोप करताना माहिती घ्यायला हवी होती. परंतु, त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून त्यांच्या शेताचा रस्ता केला आहे. त्यांच्या मनात काही गैरसमज झाले असतील तर ते नक्की दूर केले जातील.

दरम्यान मंडलिक यांनी आज माजी आमदार के. पी. पाटील यांची भेट घेऊन आपल्या सोबत येण्याचे विनंती केली. झाले गेले विसरून जावा आता साथ द्या असे त्यांनी यावेळी  पाटील यांना सांगितले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!