विकासकामाच्या नावाखाली विद्यमान खासदारांनी स्वार्थासाठी पक्ष बदलला : आम. पी. एन. पाटील वडणगे येथील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद; शाहू छत्रपतींना देशात पहिल्या क्रमांकाने निवडून देण्याचे आवाहन

Spread the news

विकासकामाच्या नावाखाली विद्यमान खासदारांनी स्वार्थासाठी पक्ष बदलला : आम. पी. एन. पाटील

वडणगे येथील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद;

शाहू छत्रपतींना देशात पहिल्या क्रमांकाने निवडून देण्याचे आवाहन

कोल्हापूर : प्रतिनिधी

विद्यमान खासदारांनी केवळ स्वार्थासाठी किती पक्ष बदलले हे जनतेला माहित आहे. ज्या विकास कामासाठी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे ते सांगतात, त्यांनी मतदारसंघात कोणता विकास केला हेही स्पष्ट करावे. अशा पक्षबदलू खासदारांना बाजूला सारून कोल्हापूरचा अभिमान असलेल्या शाहू छत्रपती यांना देशात पहिल्या क्रमांकाने निवडून देऊन इतिहास घडवूया, असे प्रतिपादन काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी केले.

वडणगे (ता. करवीर) येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते बी. एच. पाटील होते.
आमदार पी. एन. पाटील पुढे म्हणाले, स्वतःच्या जमिनी गरजूंसाठी विनामोबदला देणारे, मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार्‍या मनोज जरांगेना त्यांच्या जीवाच्या काळजीपोटी प्रत्यक्ष उपोषणस्थळी सर्वात पहिले जाऊन भेटणारे, लातूरसारख्या दूरच्या अंतरावरील जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन अडचणीत सापडलेल्या गरजूंना अन्‍नधान्याची सढळ हाताने मदत करणारे हे रयतेचे राजे आपले उमेदवार असून त्यांना या निवडणुकीत प्रचंड मताधिक्क्याने निवडून देऊया.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते तानाजी आंग्रे म्हणाले, ज्यांना आम्ही शिवसैनिकांनी मागील निवडणुकीत रक्‍ताचे पाणी करून संसदेत पाठवले, त्यांनी पाच वर्षांत एकदाही मतदारसंघात साधा संपर्कही ठेवला नाही. मातोश्रीबरोबर कशासाठी गद्दारी केली, याचे स्पष्टीकरण ते देऊ शकत नाहीत. ना निष्ठा, ना विकासाची दिशा अशा बेभरवशाच्या खासदाराला आता घरचा रस्ता दाखवूया.

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख शुभांगी पवार म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांनी बारा बलुतेदारांसाठी केलेले काम विसरण्यासारखे नाही. तोच वारसा जपणार्‍या शाहू छत्रपतींनीही कार्य केले आहे. त्यांना निवडून देण्यासाठी आता आम्ही रक्‍ताचे पाणी करू. मागील वेळी ज्यांना निवडून देण्यासाठी रात्रीचा दिवस केला, त्यांनाच पाडण्यासाठी आता रात्रीचा दिवस करू.
यावेळी शाहू छत्रपती, शिवसेना ठाकरे गट उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, समृद्धी गुरव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू पोवार, शिवसेनेचे समन्वयक हर्षल सुर्वे, माजी सरपंच सचिन चौगुले, आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील, मराठा संघटक वसंत मुळीक आदींची भाषणे झाली. यावेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष तोरसे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या वेशभूषेत येऊन सभेला अभिवादन केले. वंचित बहुजन आघाडीचे विशाल शिंदे यांनी आपल्या भाषणातून पाठिंबा जाहीर केला. युवा नेते रवी पाटील यांनी स्वागत केले. मुनवर मुल्‍ला यांनी प्रास्ताविकात वडणगे व परिसरातील गावांवर शाहू छत्रपती यांचे असलेले उपकार सांगितले. सभेला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे व बाबासाहेब चौगुले, बाजार समितीचे अध्यक्ष भैय्या पाटील-कुपेकर, संभाजी पाटील-कुडित्रेकर, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे श्रीकांत घाटगे, भोगावतीचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, संचालक केरबा पाटील, प्रा. ए. डी. चौगले, सरदार पाटील, रघुनाथ जाधव, माजी संचालक शिवाजी कारंडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, जयवंत कुंभार, भारती पोवार, सुजाता सुतार, बाजीराव पाटील, एकनाथ पाटील, माजी सभापती अण्णासाहेब देवणे, एमआयएमचे जुबेर पठाण, कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री कांबळे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, शशिकांत आडनाईक आदींसह विविध घटक पक्षांचे नेते आणि सहकारी संस्थांचे, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी उपस्थित होते.

मतदानादिवशी दारात सिलेंडरची पूजा करा!

संजय पवार यांनी या सभेत केंद्र सरकारवर चौफेर टीका करताना वाढलेल्या महागाईचे प्रतीक म्हणून मतदानाला जाण्यापूर्वी मतदारांनी दारात सिलेंडरची पूजा करून त्याला फुले वाहवीत व मगच मतदानाला जावे, असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!