विजेच्या धक्क्याने तरुण अभियंत्याचा मृत्यू
गणेशोत्सव स्वागत फलक लावताना दुर्घटना
कोल्हापूर
जिल्ह्यातील गारगोटी येथे गणेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना फलकाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुण अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. इतर पाच जण जखमी आहेत. अरुण रमेश वडर असे या मृत तरुणाचे नाव आहे.
गणेशोत्सव तोंडावर आल्याने सध्या तरुण मंडळाच्या वतीने स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. शुक्रवारी रात्रीच्या वेळी गारगोटी येथील अष्टविनायक तरुण मंडळाचे कार्यकर्ते स्वागत फलक लावत होते. त्यावेळी या फलकाचा विद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला स्पर्श झाला. यामुळे अरुण वडर यास विजेचा धक्का बसल्याने तो जागीच ठार झाला. इतर पाच जण रस्त्यावर फेकले गेले. ते जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडर याने नुकतीच इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती.