विजयाचा षटकार आमचाच असेल
सतेज पाटील
शक्तिपीठ मार्ग कोल्हापुरातून वगळणार म्हणजे काय हवेतून जाणार का?
कोल्हापूर विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर करतानाच शेवटी आम्ही षटकारच मारणार, कारण मॅच जिंकण्याच्या दृष्टीनेच आमची वाटचाल सुरू आहे असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
कोल्हापूर वगळून शक्तिपीठ महामार्ग करण्याचा निर्णय हा शुद्ध फसवणूक असल्याचे सांगतानाच हा जिल्हा वगळून पुढे हवेतून जाणार का? असा टोलाही त्यांनी मारला. पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर उत्तर बाबत जनतेचा पॅटर्न राबविण्यात येईल. दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होईल. 28 किंवा 29 ला महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांची एकत्रित अर्ज भरण्यात येतील. ज्या पक्षाला जागा त्या पक्षानेच उमेदवारी बाबत निर्णय घ्यायचा आहे. बंडखोरी होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर वगळून हा महामार्ग करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचे कळते. पण तो मार्ग पुढे गोव्याला जाणार आहे. मग कोल्हापूर वगळल्यास येथे काय हवेतून जाणार का? असा सवाल करून ते म्हणाले, 15 ऑक्टोबरला जर याबाबत निर्णय घेतला असेल तर त्याची घोषणा सात दिवसानंतर का केली. याबाबत फसवणूक सुरू असल्याचा संशय आहे.
खेड शिवापुर येथे जी रक्कम सापडली त्याबाबत बोलताना ते म्हणाले, मत विकत घेण्याचे षडयंत्र सुरू आहे. याची चौकशी व्हायला हवी.