उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा हा मोठा गैरसमज पी. डी. देशपांडे, गजलांच्या मराठी अनुवादाने अक्षरगप्पा

Spread the news

उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा हा मोठा गैरसमज

पी. डी. देशपांडे, गजलांच्या मराठी अनुवादाने अक्षरगप्पा रंगल्या

कोल्हापूर उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा हा मोठा गैरसमज समाजमानसात आहे. मुस्लिमांचा ‘कुराण’ हा धर्मग्रंथ हिंदी भाषेत येऊन सातशे वर्षे लोटली. पण तो उर्दूमध्ये केवळ अडीचशे वर्षांपूर्वी भाषांतरित झाला. त्यावेळीही त्याला विरोध झाला होता. उर्दूमध्ये कृष्णापासून शिवापर्यंत हिंदू देवतांवर विपुल लेखन झाले आहे. त्यामुळे एक उत्तम भाषा म्हणून यातील साहित्याचाही आस्वाद घेण्याची गरज् असल्याचे मत हेल्पर्स आॅफ दि हॅण्डिकॅप्ड संस्थेचे अध्यक्ष पी. डी. देशपांडे यांनी व्यक्त केले.

अक्षर दालन आणि निर्धार यांच्यावतीने आयोजित ११३ व्या अक्षरगप्पा कार्यक्रमामध्ये देशपांडे यांच्यासह मुग्धा गोरे लिंगनूरकर यांनी गालिब से गुलजार तक कार्यक्रमात विविध हिंदी, उर्दू गजल आणि त्यांचा मराठी अनुवाद सादर केला. त्यावेळी देशपांडे बोलत होते.

देशपांडे म्हणाले, ‌उर्दू शायरी म्हणजे केवळ प्रेम, विरह, आसक्ती आणि मदिराभक्ती अशी चुकीची समजूत आहे. उर्दू ही तिच्या उगमापासून व्यक्तीबरोबरच समाजमनाची स्पंदने टिपणारी भाषा आहे. भाषा हे धर्माचे नाही तर परंपरेचे वाहन असते. भाषा धर्मानुसार नाही तर प्रदेशाप्रमाणे ठरते. बांगला देश स्वतंत्र होण्यामागे ‘उर्दू नको, बंगाली भाषा हवी’ ही महत्त्वाची प्रेरणा होती. यावेळी देशपांडे आणि गोरे लिंगनूरकर यांनी मिर्झा गालिब, कैफी आजमी, मजरूह सुलतानपुरी, फैज अहमद फैज, साहिर लुधियानवी, वसीम बरेलवी, बशीर बद्र, निदा फाजली, गुलजार, जावेद अख्तर, मुनव्वर राणा यांच्या उर्दू गझल व कविता आणि त्याचा मराठी अनुवादही सादर केला.

दशरथ पारेकर, अॅड. सचिन इंजल, रविंद्र जोशी यांनी स्वागत केले. यावेळी डॅा. सुनीलकुमार लवटे, शाहीर राजू राऊत, सुबोध गद्रे, अनिल वेल्हाळ, राजश्री साकळे, डॅा. छाया ठाकुर देशपांडे, प्रा. प्रविण चौगुले, डॅा. रंजन कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी,अशोक आफळे, डॅा. प्रकाश कांबळे, स्नेहा वाबळे, स्वाती पाध्ये, अमेय जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

चौकट

स्वागतशील राहण्याची गरज

उपवासासाठी वापरला जाणारा बटाटा आणि मिरची पोर्तुगालमधून पहिल्यांदा भारतात आली आणि मराठी माणसाच्या उपवासाच्या आहाराचा प्रमुख आधार झाली. परदेश व परप्रांतातील अनेक गोष्टी आपण आपल्याशा केल्या आहेत. उर्दू ही तर भारतात निर्माण झालेली व वाढलेली भाषा आहे. त्यामुळे या भाषेबाबत सर्वांनी स्वागतशील राहण्याची गरज देशपांडे यांनी व्यक्त केली.

 

छायाचित्र ओळ

पी. डी. देशपांडे आणि मुग्धा गोरे लिंगनूरकर यांनी अक्षरगप्पांमध्ये गजल आणि त्यांचा मराठी अनुवाद सादर केला.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!