आमदार गेले… आणि लाडक्या श्वानानही घेतला जगाचा निरोप
पी. एन. पाटील यांचा विरह सहन न झाल्याने त्याने सोडले होते अन्न पाणी
म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर:
काँग्रेसचे निष्ठावंत नेते अशी ओळख असलेले कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. तेव्हापासून त्यांचा विरह सहन न झालेल्या त्यांच्या लाडक्या श्वानानही जगाचा निरोप घेतला. आमदार पाटील यांच्या निधनानंतर त्याने अन्न पाणीही सोडले होते. मालक आणि मुके प्राणी यांच्या प्रेमाचे अतूट नातं कसं असतं याचे उत्तम उदाहरण या निमित्ताने पुढं आलं.
आमदार पी एन पाटील हे बाथरूम मध्ये घसरून पडल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाला. उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना गेल्या बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. यामुळे अवघा जिल्हा शोकसागरात बुडाला. अनेक कार्यकर्ते ढसाढसा रडले. त्यांच्या निधनाने सहकार आणि राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक दिग्गज नेत्यांनी व्यक्त केली.
त्यांच्या मृत्यूला सात दिवस उलटत नाहीत तोपर्यंत आमदार पाटील यांचा लाडका ब्रुनो या श्वावानानेही जगाचा निरोप घेतला, गेल्या नऊ वर्षांपासून घरात सदस्य बनलेला श्वान लाडक्या पालकाचा विरह सहन करू शकला नाही, मुक्या प्राण्याला जीव लावल्यास प्राणीही माणसापेक्षा अधिक भावनिक असतात हेच यामुळे सिद्ध झाले आहे.
पाटील यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यापासून त्यांच्या या लाडक्या श्वानाने अन्नपाणी सोडले. घरातील सर्वांनी त्याला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो जेवत नव्हता. पी एन यांच्या आठवणीत आज या मुक्या प्राण्यांनाने ही जीव सोडला, तो आजारी पडल्याने त्याच्यावर उपचार ही करण्यात आले पण उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. गेली नऊ वर्ष आपल्या मालकाची इमाने इतवारी प्रामाणिक राहिलेल्या या श्वानाच्या एक्झिट नंतर मालकावरील या मुक्या प्राण्याचं प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.