विधानसभेसाठी सतेज पाटील यांच्याकडून टोल आंदोलनाचा स्टंट
खासदार धनंजय महाडिक यांचा टोला
कोल्हापूर : आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आमदार सतेज पाटील आंदोलनाचा स्टंट केला. ज्यांनी टोलची पावती फाडली त्यांनी टोलविरोधी आंदोलन करणे हे हास्यास्पद आहे. मंत्री असताना त्यांनी कोल्हापूरकरांच्यावर टोल लादला होता, हे जनतेच्या स्मरणात आहे..”असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार बैठकीत मारला.
किणी टोल नाका येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली टोल विरोधी आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी पत्रकार बैठकीत बोलताना खासदार पाटील यांनी आमदार पाटील यांच्यावर जोरदार आरोप केला. ते म्हणाले, महामार्गाचे सहा पदरी रस्त्याचे काम सुरू असताना टोलमध्ये 25 टक्के सूट असते. हा केंद्राचा नियमच आहे. तेव्हा काँग्रेसच्या आंदोलनाचा आणि टोललमध्ये 25 टक्के सूट याचा काही संबंध नाही. त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलनाचे श्रेय म्हणणे हे हास्यास्पद आहे.
महाडिक म्हणाले, रस्ते चांगले नसताना टोल आकारू नये असे मलाही वाटते. सतेज पाटील यांनी सरकारमध्ये असताना टोलचे समर्थन केले होते. टोलची पावती फाडली होती. आमदार खासदार मंत्री यांच्या वाहनांना टोल आकारणी होत नाही. मात्र पाटील यांनी टोलची पावती फाडली होती. आता ते टोलविरोधी आंदोलन करतात यासारखे दुसरे काही हास्यास्पद नाही.
महाडिक म्हणाले, पाटील हे मंत्री असताना लावलेला टोल भारतीय जनता पक्षाने घालवला. 450 कोटी रुपये कंत्राटदारांना देऊन कोल्हापूरला टोलमुक्ती भाजपा सरकारने दिली. त्यामुळे पाटील यांनी आंदोलनाची कितीही स्टंटबाजी केली तरी जनता त्यांना साथ देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महेश जाधव, राहूल चिकोडे, रूपाराणी निकम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.