शिक्षण होताच पण राजकारणाचा ही ऋतुराज पाटील यांनी बाजार मांडलाय : प्रा. जयंत पाटील*

Spread the news

*शिक्षण होताच पण राजकारणाचा ही ऋतुराज पाटील यांनी बाजार मांडलाय : प्रा. जयंत पाटील*

कोल्हापूर : स्वतःच्या भरमसाठ पैसा उकळणाऱ्या शिक्षण संस्था अस्तित्वात असताना सरकारी शाळांच्या सुधारणेचे काम कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील करणार नाहीत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाचा बाजार मांडला आहेच पण ते आता राजकारणाचा देखील व्यवसाय करत आहेत. असे प्रतिपादन प्राध्यापक जयंत पाटील यांनी केले.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते. विक्रम नगर येथे झालेल्या या सभेत, “जिल्हापरिषद व महानगर पालिकेच्या शाळा सुधारल्या तर कोल्हापुरातील ग्रामीण भागातील गरीब घरच्या पोरांना शिक्षण घेणे सोयीचे होईल. या शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले तर त्यांना महागड्या शिक्षण संस्थांमध्ये पर्यायाने आमदारांच्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची आवश्यकता भासणार नाही. आणि त्यांच्या शिक्षणसंस्थांकडे कुणी फिरकणार नाही. म्हणूनच दक्षिण मधील शाळांची दयनीय अवस्था झाली आहे.” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

महायुती सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत केले आहे. पण आमदारांच्या शिक्षणसंस्थांमध्ये असे काही होत नाही. डोनेशनच्या मोठाल्या रकमा घेऊन इथे प्रवेश दिले जातात. म्हणून वर्षानुवर्षे त्यांच्या शिक्षणसंस्थांमध्ये भर पडत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचे खिसे भरण्याचे काम सर्रास सुरु ठेवले आहे. अगदी याचप्रमाणे राजकारणाचा व्यवसाय करण्यात ऋतुराज पाटील यांनी धन्यता मानली आहे. असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील यांनी केलेल्या विकास कामांचे मोठाले बॅनर आणि त्यावरचे स्कॅन कोड याच्या चर्चा आता ऐरणीवर आहेत. कोट्यावधी रुपयांची विकास कामे केल्याचे सांगत असताना ही कामे नेमकी कुठे आणि कशा पद्धतीने करण्यात आली हे देखील त्यांनी आवर्जून सांगावे. आजवर दक्षिण आणि उत्तर दोन्ही मतदार संघ सतेज पाटील यांच्याकडेच होते, पण इथले सगळेच प्रश्न जैसे थेच आहेत.

ते म्हणाले, युवकांसाठी मी ५ अभ्यासिका उभारणार म्हणून ऋतुराज पाटील यांनी जाहीरनाम्यात नमूद केले होते, त्यासाठी ४ कोटींचा निधी देखील मंजूर झाला. पण या अभ्यासिका केवळ बॅनर वरच दिसतात. प्रत्यक्षात या अभ्यासिका बॅनर वर दिलेल्या पत्त्यावर शोधूनही सापडत नाहीत. मग हे ४ कोटी गेले कुठे याबाबत ते काहीच बोलत नाहीत. त्यांनी केलेल्या या कामात नक्की विकास कुणाचा झाला… हा प्रश्न आपसूकच समोर उभा राहतो. स्वतःच्या शिक्षण संस्था असल्यामुळे शिक्षण हा ऋतुराज यांचा धंदा आहे हे स्पष्ट होते, पण आता राजकारणाचा ही त्यांनी धंदा केला आहे. धंदा म्हटल की तो फायद्यासाठी च असतो हे जनतेने लक्षात ठेवावे.

याप्रसंगी माजी नगरसेवक नूतन रवींद्र मुतगी, प्रकाश काटे, कमलाकर भोपळे, भाजपचे महेश जाधव, रूपाराणी निकम, रवींद्र मुतगी, शेखर जाधव, माणिक बाकळे, मानसिंग पाटील, विजय सूर्यवंशी, उदय पवार, नाना गिरी, शांतीजित कदम, विशाल कांबळे, संतोष सूर्यवंशी, रिमा पालनकर, अलका जगदाळे, संगीता तिरुके यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व तमाम जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!