*आमदारांना सत्कार स्वीकारण्यासाठी वेळ आहे पण पिडीत कुटूंबास आधार देण्यास वेळ नाही हे दुर्दैव*
*समरजितसिंह घाटगेंची आ.मुश्रीफांवर टिका*
*घाटगे दांपत्याने गडहिंग्लजमधील पिडीतेच्या कुटूंबियांची भेट घेत दिला आधार*
कोल्हापूर,प्रतिनिधी.
गडहिंग्लज शहरातील अल्पवयीन मुलीवर परप्रांतीयाकडून झालेली अत्याचाराची घटना अत्यंत निषेधार्ह आहे.या मुलीसह कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी नागरिकांसह लोकप्रतिनिधी अशा सर्वांचीच आहे.मात्र सत्ता स्थापनेमध्ये आणि मंत्रीपदामध्ये व्यस्त असलेल्या आमदारांनी आपल्या मतदारसंघांमध्ये ज्यांनी त्यांना निवडून दिले त्याच्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची अशी घटना जेव्हा घडते तेव्हा थोडासा वेळ काढून त्या कुटुंबाला भेट देऊन आधार देणे आवश्यक होते.त्यांना गडहिंग्लज शहरात सत्कार स्वीकारण्यासाठी वेळ आहे पण या कुटूंबाला आधारासाठी साधा फोन करण्यास वेळ नाही हे दुर्दैवी आहे.पोलीसांना फोन करुन त्याच्या रेकॉर्डिंगचा फक्त स्टंट करुन चालत नाही. अशी टीका शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता केली.
श्री.घाटगे यांनी त्यांच्या पत्नी सौ.नवोदिता घाटगे,जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांच्यासह या पीडित कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना आधार दिला.त्यानंतर समाज माध्यमावर व्हायरल केलेल्या व्हिडिओद्वारे त्यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला.
घाटगे पुढे म्हणाले,विद्यमान आमदार यांनी या कुटुंबासाठी वेळ द्यायला पाहिजे होता. ते सत्तेत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून या कुटुंबीयांस न्यायाची अपेक्षा आहे. त्यांना वेळ नसेल तर काळजी करू नका त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व सहकारी सक्षम आहोत.कागल गडहिंग्लज उत्तूर विभागात घडणाऱ्या अशा घटना शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज म्हणून कदापिही आम्ही खपवून घेणार नाही. जेव्हा हे परप्रांतीय लोक कामाला येतात तेव्हा त्याचं नीट डॉक्युमेंटेशन पोलीसनी घेतलं पाहिजे आणि या प्रकरणातील आरोपीला पुढे बेल न मिळण्यासह कडक कारवाई व्हावी यासाठी खबरदारी घ्यावी.जेव्हा ही बाब उघडकीस आली तेव्हा त्या कुटुंबावर दबाव आणण्याचे काम काही लोकांनी केले.हे चुकीचे आहे. आम्ही त्यांना शब्द दिलाय की आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे.त्या मुलीच्या पाठीशी आहोत.आणि त्या मुलीनेही आम्हाला शब्द दिला आहे की तिला शिकून पुढे पोलीस ऑफिसर व्हायचे आहे. अशा मुलीला धीर आणि पाठबळ दिले पाहिजे. कोणत्याही दबावाशिवाय निःपक्षपातीपणे तपास व चौकशी व्हावी यासाठी आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊ अशी ग्वाही त्यांनी या पीडित कुटुंबीयांना दिली.
चौकट
राजकिय दबावानेच तपासात दिरंगाई
घाटगे पुढे म्हणाले, या विषयात खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की ही घटना वीस दिवसापूर्वी झाली होती. पण काही राजकीय व्यवस्थापनांनी आणि काही लोकांना ही गोष्ट माहीत असून सुद्धा त्याची कबुली देऊन सुद्धा ही गोष्ट दाबली गेली. ती का दाबली याचा लोकांनी विचार केला पाहिजे आणि जेव्हा ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वी लोकांसमोर आली तेव्हा पोलीस प्रशासनावर कोणी दबाव आणला, पोलीस केस घेण्यामध्ये वेळ घेतला गेला मेडिकल टेस्ट करण्यामध्ये प्रचंड वेळ घालवला गेला.याचाही विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाला आम्ही स्पष्ट सांगतो की महिला सुरक्षितता आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आरोपींवर कडक कारवाई व्हायला पाहिजे.या गोष्टीसाठी स्वातीताई कोरी असतील महेश कोरी असतील आणि आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते असतील यांनी पोटतिडकीने हा विषय पुढे आणला. आणि सर्वपक्षिय आंदोलन केले.