पवार साहेबांशी वैर नाही. परंतु; समरजीत यांची खैर नाही……!* *पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा* *येणारी विधानसभा निवडणूक म्हणजे “नायक विरुद्ध खलनायक” लढत*

Spread the news

*पवार साहेबांशी वैर नाही. परंतु; समरजीत यांची खैर नाही……!*

*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा*

*येणारी विधानसभा निवडणूक म्हणजे “नायक विरुद्ध खलनायक” लढत*

*श्री. पवारसाहेब नेहमीच सांगतात, राजा विरुद्ध प्रजा लढतीत नेहमी प्रजाच जिंकते*

*मुंबई, दि. ४:*
कुणाला किती मते पडणार आहेत, हे निवडणुकीच्या निकालातच समजून येईल. वयाची २५ वर्षे झालेल्या प्रत्येकाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला उभारण्याचा अधिकार आहे. कुठल्याही माणसाला आपण कधीच कमी लेखत नाही. शरद पवारसाहेबांशी माझे वैर नाही. परंतु; समरजीत यांची आता खैर नाही, असा सज्जड इशारा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. येणारी विधानसभेची ही निवडणूक म्हणजे “नायक विरुद्ध खलनायक” अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांशी श्री. मुश्रीफ बोलत होते. कागलमध्ये समरजीत घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटात झालेला प्रवेश आणि जाहीर सभा याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले.

यापूर्वी कागलमध्ये झालेल्या तिरंगी लढतींमुळे तुमचा विजय सोपा होत होता. यावेळी समोरासमोर लढत आहे. या प्रश्नावर श्री. मुश्रीफ म्हणाले, आतापर्यंत आपण एकूण सहा विधानसभा निवडणुका लढलो. त्यापैकी एकास एक अशा लढती तीनवेळा झालेल्या आहेत. तिरंगी लढत एकवेळाच झाली आहे.

शरद पवार यांच्या कागलमधील गैबी चौकातील भाषणाबाबत विचारले असता श्री. मुश्रीफ म्हणाले, शरद पवारसाहेब यांनी नेहमीच प्रजेचा म्हणजे रयतेचाच प्रचार केलेला आहे. आजही त्यांची भूमिका तीच आहे. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या चार निवडणुका आणि माझ्या प्रचारासाठी सहा निवडणुका असे एकूण दहाहून अधिक वेळा श्री. पवारसाहेब गैबी चौकातील जाहीर सभेसाठी आलेले आहेत. या सर्व सभांमधून त्यांनी सांगितले आहे कि, “राजा विरुद्ध प्रजा” या लढाईत नेहमी प्रजाच जिंकत असते. यावेळीही त्यांना तेच म्हणायचे आहे.

मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, आम्ही गेलेल्यांमध्ये ४५ ते ५० आमदार आहेत. श्री. पवारसाहेब यांनी सगळ्यांनाच मोठे केले आहे. श्री. पवारसाहेब आजही मला आदरस्थानी आहेत. परंतु; आठवड्यापूर्वी जयंत पाटील आले. आता श्री. पवारसाहेबांनी सभा घेतली. श्री. पवारसाहेब आणि जयंत पाटील माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांच्या मागे का लागले आहेत? हे मला अजूनही समजत नाही.

*नायक विरुद्ध खलनायक…….!*
तुमच्या विरोधात समरजीत घाटगे यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये घेतले आहे. या प्रश्नावर बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, त्यांना कशासाठी घेतलं आहे ते मला काही माहीत नाही. तुमच्या मागे कारवायांचा ससेमिरा लावला होता व तुमच्या कुटुंबाची फरपट झाली होती. या प्रश्नावर मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला की, तो ससेमिरा कोणी लावला होता? यावेळी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांपैकीच एकाने उत्तर दिले, समरजीत घाटगे यांनी. हा संदर्भ घेत श्री. मुश्रीफ म्हणाले, त्यामुळेच ही निवडणूक म्हणजे “नायक विरुद्ध खलनायक” अशी लढत आहे.
============


Spread the news

You may also like

error: Content is protected !!