*आरोग्य यंत्रणा सक्षम असणे काळाची गरज; वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या सोडविण्यास प्रयत्नशील : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर*
*वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत समस्या व उपाययोजनांबाबत विविध वैद्यकीय संघटनांशी बैठक*
कोल्हापूर, दि.२६ : कोव्हीड सारख्या महामारीने संपूर्ण जगात वैद्यकीय क्षेत्राच्या मर्यादा दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम असणे काळाची गरज आहे. सद्याच्या आधुनिक जगतामध्ये वैद्यकीय क्षेत्रातही आधुनिक सुधारणा झाल्या आहेत. पण वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत समस्यांमध्येही वाढ झाल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे आगामी काळात वैद्यकीय क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत समस्या व उपाययोजना यांचा आढावा घेण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालयांच्या संघटना, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत संघटनांची शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस वैद्यकीय क्षेत्रातील समस्यांची माहिती श्री.राजेश क्षीरसागर यांनी जाणून घेतली. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागास वाढीव निधी द्यावा, नर्सिंग स्टाफची कमतरता, नर्सिंग साठी PDT मॉडेल तयार करणे, दंतचिकित्सा व मानसोपचाराचा वैद्यकीय योजनेत समावेश व्हावा, आयुर्वेदिक सेक्टरला जागा उपलब्ध व्हावी, नर्सिंग कॉलेजेसना शासकीय रुग्णालयांशी सलग्न करण्यात यावे, कर्नाटक राज्याप्रमाणे ३० बेडपेक्षा कमी क्षमतेचे रूग्णालयातही शासनाच्या गोल्डन कार्डचा लाभ द्यावा आदी प्रमुख समस्या मांडण्यात आल्या.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, ज्या प्रमाणे देशाचे सैनिक हे आपल्या देशाचे रक्षण करतात त्याच प्रमाणे डॉक्टर हे आपल्या आरोग्याचे रक्षण करतात. म्हणून आपल्या समाजात डॉक्टरांना आदराने पाहिले जाते आणि त्यांना विशेष स्थान देखील आहे. आजच्या युगात वैद्यकीय क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले आहेत. वैद्यकीय तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. डॉक्टरांचे जीवन हे रुग्णांची सेवा करणे हेच आहे. असे असताना वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना डॉक्टरांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. शासन प्रतिनिधी या नात्याने डॉक्टरांच्या समस्या शासनापर्यंत पोहचाव्यात, विचारांची देवाणघेवाण होवून या समस्यांमधून मार्ग निघावा हेच या बैठकीचे उद्दिष्ठ आहे. आजच्या बैठकीत वैद्यकीय संघटनांच्या वतीने मांडण्यात आलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या हेतून अधिवेशन काळात मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब आणि आरोग्य मंत्री महोदयांची भेट घेवून यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू. आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने मित्रा संस्थेच्या माध्यमातून विशेष संकल्पना राबवू, अशी ग्वाही दिली.
सीपीआर अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय रणवीर, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, डॉ.अजित लोकरे, मेडिकल असोसिएशन चेअरमन डॉ.अमोल कोडोलीकर, प्रायव्हेट नर्सिंग होम असोसिएशन चे डॉ.भरत कोटकर, डॉ.राजस्वी माने, डॉ.राजेंद्र पाटील, डॉ.अमोल खोत, डॉ.प्रसाद कोळी, डॉ.शीतल देशपांडे, डॉ.प्रविण नाईक, शिवसेना वैद्यकीय समन्वयक कृष्णा लोंढे यांच्यासह सुमारे ३८ वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.