वादळात ही संघर्ष करत राहणाऱ्या नेत्याबरोबर
निदूर गाव डॉ. नंदाताईंच्या पाठिशी खंबीरपणे उभे
चंदगड
काँग्रेसची विचारधारा रूजवण्यासाठी कै. व्ही. के. चव्हाण-पाटील यांनी आपली उभी हयात घालविली. अनेक वादळं आली. तालुक्यातील काँग्रेस संपते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली. बडे नेते सोडून गेले. पण या वादळात निदूर गाव काँग्रेस विचारधारा जपत ठाम राहिला आहे. हा काँग्रेसचा गाव आज आघाडीच्या उमेदवार डॉ. नंदिनी बाभुळकर यांच्या पाठिशी खंबीर उभा राहणार असल्याची ग्वाही काँग्रेसनेते विक्रमसिंह चव्हाण-पाटील यांनी दिली.
निट्टर येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आम्ही पळपुटे सरदार नाही. एकदा वचन दिलं की ते आम्ही पाळतो. आमचे आजोबा कै. व्ही. के. चव्हाण-पाटील यांची पुण्याई चंदगड तालुका कधीही विसरणार नाही. ते लोकनेते होते. तिच विकासाची विचारधारा नंदाताईंच्या रूपाने आपणाला पाहायला मिळत आहे. त्यांचा वचनामा हा चौफेर विकासाची साक्ष देत आहे.
नामदेव पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे आम्ही वाळीत पडलो होतो. आता आम्हाला त्रास सहन करायचा नाही. कोणत्याही परिस्थितीत मोठ्या मताधिक्याने डॉ. नंदाताईंना विजयी करण्यासाठी आम्ही सर्व आघाड्यांवर प्रयत्न करणार आहोत. यावेळी बोलताना प्रा. सचिन पाटील म्हणाले, कै. व्ही. के. चव्हाण- पाटील यांच्यानंतर उच्चविद्याविभूषीत अभ्यासू आणि धडाडीच्या नेत्या चंदगड तालुक्यासाठी आमदार म्हणून लाभणार आहेत, हे आमचे भाग्य आहे.
यावेळी माजी प्राचार्य वाय. व्ही. कांबळे म्हणाले, आज संविधान धोक्यात आले आहे. बाबासाहेबांना अपेक्षित असलेली लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही डॉ. नंदिनी बाभुळकर यांना विजयी करणार असल्याचे सांगितले. यावेळी अशोक पाटील, नारायण पाटील, अमोल सुतार, पंकज हिरामणी, शिवाजी पाटील, बाबू पाटील, पुंडलिक कांबळे, सचिन पाटील, अमित पाटील, संतोष कांबळे, इमाम मुल्ला, संजय गावडे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.