*आय.टी.क्षेत्रासाठी आरक्षित जागेच्या वाटपाचा प्रस्ताव शासनास सादर करा : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका प्रशासनास सूचना*
कोल्हापूर, दि. २१ : कोल्हापुरात दि.२५ जून रोजी राज्याची पहिलीच शाश्वत विकास परिषद पार पडत आहे. यामाध्यमातून कोल्हापुरातील उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार यासह शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. भारतातील विकसित शहरांचा विचार करता बेंगलोर, हैदराबाद, पुणे आदी शहरामध्ये आयटी क्षेत्र सर्वात जलद गतीने कार्यानिव्त झाले आहे. यामुळे या शहरांत रोजगार निर्मितीसह शहराच्या विकासामध्ये मोलाची भर पडली आहे. कोल्हापूर शहराचा विचार करता या ठिकाणची भौगोलिक स्थिती आयटी क्षेत्रासाठी पूरक असून आयटी क्षेत्रासाठी सुमारे १२९०० चौ.मी जागा आरक्षित करूनही त्याचे वाटप झाले नसल्याने आयटी क्षेत्र कोल्हापूर शहर आयटी क्षेत्रात मागे राहिले आहे. त्यामुळे आरक्षित जागेच्या वाटपाबाबतचा प्रस्ताव तात्काळ शासनास सादर करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासनास दिल्या.
कोल्हापूर आयटी असोसिएशनच्या मागण्यासंदर्भात आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर महानगरपालिका येथे आढावा बैठक पार पडली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, दिनांक २५ रोजी कोल्हापूर येथे शाश्वत विकास परिषद होत आहे. त्या अनुषंगाने यामध्ये कोल्हापूरच्या विकासाचा रोड मॅप ठरविला जाणार आहे. विकसित शहरांचा विचार करता तेथील आयटी क्षेत्रात प्रगती झाल्याचे पहावयास मिळते. कोल्हापुरातून अनेक युवक युवती पुणे, बेंगलोर अशा शहरातील आयटी कंपन्यामध्ये कार्यरत आहेत. या क्षेत्राचा विकास व्हावा याकरिता कोल्हापूर आयटी असोसिएशन कार्यरत असून सुरवातीला नाममात्र ५०० मनुष्यबळाच्या आधारावर कार्यान्वित झालेले आयटी क्षेत्र आज सुमारे ७००० रोजगार उपलब्ध करू शकले आहे. गेल्या १५ वर्षापासून आयटी असोसिएशन महापालिका प्रशासनाकडे जागेची मागणी करत आहे. याकरिता महानगरपालिकेने टेंबलाईनाका येथील सुमारे १२९०० चौ.मी.जागा आरक्षित केली आहे. पण, या जागेचे वाटप झाले नसल्याने आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. या जागांचे वाटप झाल्यास सुमारे १५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक- युवतींना होणार आहेच त्याचबरोबर पर्यायाने कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नात भर होणार आहे. राज्याच्या, देशाच्या विकासात भर घालण्यासाठी राज्यातील शहरे विकसित करण्याचा उद्देश मित्रा संस्थेने ठेवला असून, कोल्हापूर हे प्रथम शहर त्यासाठी निवडले गेले आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टीने टेंबलाईवाडी येथे राखीव ठेवण्यात आलेले जागेचे हस्तांतणार एमआयडीसी कडे करण्यात यावे आणि एमआयडीसी कडे करून त्याचे प्लॉटिंग करण्यात यावे प्लॉटिंग करून रेडीरेकनरच्या दराप्रमाणे सदर जागांचे वाटप आयटी कंपन्याना करण्यात यावे. याकरिता आवश्यक प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करावा, अशा सूचना महापालिका प्रशासनास देत. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांशी याबाबत चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यात येईल, अशी ग्वाही आयटी असोसिएशन कोल्हापूरच्या शिष्टमंडळास दिली.
या बैठकीला महापालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, आयटी असोसिएशन कोल्हापूरचे प्रताप पाटील, प्रसन्न कुलकर्णी, रणजीत नार्वेकर, राहुल मींच, शांताराम सुर्वे, विश्वजित देसाई, कैलास मेढे, मंदार पेटकर, मनिष राजगोळकर, स्नेहल बियाणी, आदिनाथ पाटील, धवल चौगुले, सुर्यकांत दोडमिसे आदी उपस्थित होते.