Spread the news

कागल मध्ये मंडलिकांचे घटलेले मताधिक्य आपल्यालाही धक्कादायक

हसन मुश्रीफ यांची कबुली

कोल्हापूर प्रतिनिधी एकूणच देशातील परिस्थिती व अन्य कारणांमुळे अनेक ठिकाणी अशा पडझडी झाल्या. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातही थोडीशी पडझड झाली. परंतु; कोल्हापूर जिल्ह्यात दोनपैकी एक जागा राखण्यात यश मिळाले. कोल्हापूरची जागा राखू शकलो नाही. त्याला अनेक कारणेही अनेक आहेत. छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी असणं, राज्यात निर्माण झालेले मराठा आरक्षण, कांदा प्रश्न, शक्तिपीठ महामार्ग, बौद्ध आणि मुस्लिम समाज असे अनेक प्रश्न होते. त्याची कारणमीमांसा आम्ही करूच. कारण; येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये असं होऊ नये यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. महायुतीला एकदिलाने हातात हात घालून विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागेल.

कागल मतदारसंघाच्या मताधिक्याबाबत विचारले असता पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघात १५ हजारावर मताधिक्य राखू शकलो. या मतदारसंघात आम्हाला ७० ते ८० हजार मताधिक्य अपेक्षित होते. ते मिळाले नाही. देशासह राज्यातील परिस्थितीचा जसा सगळीकडे परिणाम झाला तसा तो इथेही झाला. चंदगडमध्ये आठ ते नऊ हजार मताधिक्याने मागे राहिलो. करवीर आणि राधानगरी या दोन्ही मतदार संघात फार मोठे मताधिक्य घटले, त्याचा आम्ही निश्चितपणे विचार करू. दक्षिणचे मी मनापासून कौतुक करेन. विरोधकांचे मताधिक्य फक्त सहा हजारावर रोखण्यात माजी आमदार अमल महाडिक व त्यांच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले. शहरात उत्तरमध्ये विरोधकांचे मताधिक्य दहा हजारावर रोखण्यात आम्ही यशस्वी झालो. लवकरच गावनिहाय आकडेवारी येईलच.

माझा अंदाज होता की, कागलच्या मताधिक्यावर प्रा. मंडलिक निवडून येतील. याला फार मोठा छेद बसला. मलासुद्धा हा अनपेक्षित धक्काच आहे. अनेक कारणांपैकी एक असलेले प्रमुख कारण म्हणजे, शक्तीपीठ महामार्ग. कागल मतदार संघातील १५ गावे आणि राधानगरी -भुदरगड मतदारसंघातील २५ ते ३० गावांमधून हा रस्ता जातो. या गावांमधील शेतकऱ्यांचा या रस्त्याला विरोध आहे. या सगळ्या मंडळींना विरोधात घालणारी एक यंत्रणा कार्यरत होती. त्याचाही परिणाम झाला. अनेक कारणे आहेत त्याचे आत्मचिंतन केले पाहिजे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये ही कारणे पुन्हा येणार नाहीत व लोक नाराज होणार नाहीत याची दक्षता आम्हाला घ्यावी लागेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मतदारांनी नाकारले आहे काय? या प्रश्नावर श्री. मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या सात जागा निवडून आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा फक्त दोन जागाच कमी आहेत. आम्हाला चारपैकी एक जागा मिळालेली आहे. गेल्यावेळीही आमची एकच जागा होती. बारामतीमध्ये मतदारांनी लोकसभेला सुप्रिया सुळे व विधानसभेला अजितदादा पवार असा विचार केलेला दिसतोय. विधानसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दोन लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येतील आणि राज्यात उच्चांक करतील, असेही ते म्हणाले. कारण; लोकसभेला लोक वेगळा विचार करतात आणि विधानसभेला लोक वेगळा विचार करतात, असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात आमदारांमध्ये चलबिचल सुरू आहे काय? या प्रश्नावर ते म्हणाले, काहीही चलबिचल नाही. ते जिथे आहेत तिथे सुरक्षित आहेत. महायुतीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने संघटित होऊन लढण्यासाठी ते सज्ज आहेत. एनडीए सत्तेवर आल्यास संविधान बदलले जाईल या प्रचाराचा फार मोठा परिणाम बौद्ध समाजावर झाला. राहुल गांधी राज्यघटनेची प्रत हातात घेऊनच भाषण करत होते. दरम्यान; एनडीएचे सरकार सत्तेवर येईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतील, असेही ते म्हणाले.
============


Spread the news

You may also like

error: Content is protected !!