घाबरुन न जाता वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करा; शासन आपल्या पाठीशी* *-पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला पूरग्रस्तांना धीर*

Spread the news

*घाबरुन न जाता वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करा; शासन आपल्या पाठीशी*
*-पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला पूरग्रस्तांना धीर*

• *पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी*
• *निवारागृहातील स्थलांतरित नागरिकांशी साधला संवाद*

• *नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याला प्राधान्य*
• *जिल्ह्यात एनडीआरएफ चे एक पथक दाखल; आणखी एक पथक होणार उद्या दाखल*

*कोल्हापूर, दि. २६* : कोल्हापूर जिल्ह्याला वेळोवेळी आलेल्या पुराचा अनुभव असून पाणी कोणत्या भागात आल्यानंतर पुरस्थिती निर्माण होते याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता नदीची पाणी पातळी व पूर परिस्थिती पाहून सुरक्षित ठिकाणी वेळेत स्थलांतरित होवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करुन शासन-प्रशासन आपल्या पाठीशी आहे, जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे घरांची पडझड, दुकाने, टपऱ्या, शेती आदींचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ दिले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर शहरातील सुतारवाडा, कुंभार गल्ली, जामदार क्लब येथील पुरबाधित भागाला तसेच चित्रदुर्ग मठ निवारागृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून पुरस्थितीबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच निवारागृहातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी उपस्थित होत्या.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक स्थिती अशी आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाऊस पडतो. धरणांची संख्याही मोठी असल्यामुळे त्या ठिकाणी धरणे भरल्यानंतर नेहमीच मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो. यामुळे धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि खालील पाऊस यांचे पाणी मोठ्या प्रमाणात नदीच्या पात्रातून वाहते. साधारण दर दोन वर्षांनी नेहमीच पुरस्थिती निर्माण झालेली आपण पाहिलेली आहे. त्यामुळे आता पाणी पातळी पाहून नागरिकांनी स्वतःहून निर्णय घेऊन स्थलांतरीत व्हावे. या प्रक्रियेत प्रशासनाकडून ठिकठिकाणी निवारागृहांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जिल्ह्यात एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले असून आणखी एक पथक उद्या दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टी आणि धरणातून होणारा विसर्ग आणि त्यामुळे वाढत जाणारी नदीची पाणी पातळी व पूर परिस्थितीचा विचार करुन नागरिकांचे वेळेत स्थलांतर करा. कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्या. स्थलांतरीत नागरीकांना चहा, नाश्ता, भोजन, औषधे व अन्य सोयी -सुविधा वेळेत पुरवा, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनाबाबत बैठकीत दिल्या.

*नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याला प्राधान्य*

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली असल्यामुळे शहर व ग्रामीण भागात शेतीत व रहिवासी वस्तीत देखील पुराचे पाणी गेले आहे. जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे घरांची पडझड, दुकाने, टपऱ्या, शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाच्या निकषानुसार तातडीने मदत देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. यासाठी नुकसानग्रस्त भागाचे वेळेत पंचनामे करावेत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!