बेंगलोरच्या धर्तीवर उदगावमध्ये होणार राज्यातील पहिले अत्याधुनिक प्रादेशिक मनोरुग्णालय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून दीडशे कोटींच्या निधीला मंजूरी

Spread the news

बेंगलोरच्या धर्तीवर उदगावमध्ये होणार राज्यातील पहिले अत्याधुनिक प्रादेशिक मनोरुग्णालय

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून दीडशे कोटींच्या निधीला मंजूरी­

कोल्हापूर, प्रतिनिधी

३६५ खाटांची व्यवस्था, आत्याधुनिक पद्धतीने रुग्णावर उपचार, नक्षत्र गार्डन, योगा सेंटर, कलर थेरिपी, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग, मनोविकृत गरोदर महिलांसाठी विशेष विभाग आणि बेंगलोर येथील अत्याधुनिक निमन्स आयटीएचएसच्या धर्तीवर हॉस्पिटलचे स्ट्रक्चर या सर्व सोयी – सुविधानियुक्त उदगाव येथील क्षयरोग हॉस्पिटलच्या परिसरातील २४ एकरात साकारणाऱ्या अत्याधुनिक प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दीडशे कोटी रुपयांची मंजुरी आणली असून कालच त्याचा शासन निर्णय झाला आहे. आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पहिल्यांदाच उदगाव येथे अत्याधुनिक प्रादेशिक मनोरुग्णालय उभे राहणार आहे.

शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबरोबर आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजीही घेतली आहे. उदगाव येथे सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवर उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी सुरू असून येत्या काही महिन्यातच सदरचे उपजिल्हा रुग्णालय सेवेत येणार आहे. याचबरोबर उदगाव येथे ३६५ खटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय होण्यासाठी त्या दृष्टीने आरोग्य राज्यमंत्री असताना शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला शासनाने मान्यता देवून या रुग्णालयासाठी दीडशे कोटींचा निधी जाहीर केला असून लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

बेंगलोर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेसच्या धर्तीवर सदरच्या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार असून बेंगलोर येथे असलेल्या रुग्णालयाची क्षमता १ हजार खाटांची असून या ठिकाणी मानसोपचारांबरोबरच विविध प्रकारचे पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. अशा या अत्याधुनिक संस्थेच्या इमारतीची पाहणी करून आल्यावर काही बाबी अंदाजपत्रकात समाविष्ट केल्या आहेत. तसेच ठिकाणी असलेल्या अद्ययावत सोयी-सुविधा याचा विचार करूनच अंदाजपत्रक करण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी झालेल्या बैठकीत सुचवलेले बदलही यात अंतर्भूत करण्यात आले आहेत.
२४ एकर क्षेत्रात एकूण २७ हजार स्क्वेअर मीटरमध्ये या प्रादेशिक मनोरुग्णालयाचे बांधकाम होणार आहे. यामध्ये पुरुष वार्ड, महिला वार्ड, अतिदक्षता विभाग, मनोविकृत गरोदर महिलांसाठी विशेष सोय, योगा सेंटर, नक्षत्र गार्डन, कलर थेरिपी व अत्याधुनिक पद्धतीचे उपचार आणि आरोग्य विभागाची मोठी टीम या ठिकाणी कार्यरत असणार आहे. महाराष्ट्रातील पहिलेच अत्याधुनिक प्रादेशिक मनोरुग्णालय मंजूर करून आणणारे डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर हे पहिलेच आमदार ठरले आहेत.
या रुग्णालयाच्या मंजुरीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सहकार्य लाभले असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. दरम्यान या रुग्णालयाचा लाभ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना होणार असून आरोग्यसेवेच्या माध्यमातून शिरोळ तालुका हा अग्रभागी राहणार आहे.

————
मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी दीडशे कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या सहकार्याने प्राप्त झाला असून लवकरच टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या रुग्णालयाचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल.

– डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार


Spread the news

You may also like

error: Content is protected !!