शाहू छत्रपतींच्या मताधिक्क्याने विरोधकांचे डोळे पांढरे होतील : संजयबाबा घाटगे खुल्या चर्चेचे मंडलिकांचे आव्हान आ. सतेज पाटील यांनी स्वीकारले; सेनापती कापशीच्या सभेला लोटला जनसागर

Spread the news

शाहू छत्रपतींच्या मताधिक्क्याने विरोधकांचे डोळे पांढरे होतील : संजयबाबा घाटगे

खुल्या चर्चेचे मंडलिकांचे आव्हान आ. सतेज पाटील यांनी स्वीकारले; सेनापती कापशीच्या सभेला लोटला जनसागर

कोल्हापूर : प्रतिनिधी
कागलची जनता शाहू छत्रपती यांच्या पाठिशी भक्‍कमपणे उभी आहे. त्यामुळे उगाचच जनतेत हवा निर्माण करण्यासाठी विरोधक दीड लाखांचे मताधिक्क्य घेऊ अशा वल्गना करीत आहेत. पण त्यांच्या या वल्गना दिवास्वप्नच ठरणार असून या निवडणुकीत शाहू छत्रपतींना मिळालेले मताधिक्‍क पाहून विरोधकांचे डोळे पांढरे होतील, असा विश्‍वास माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी व्यक्‍त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचा अजेंडा हा देशाचा मुख्य कणा असलेला शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या उन्‍नतीचा आहे. मात्र अशा घटकांना वार्‍यावर सोडून बड्या धेंडांना, उद्योजकांना पाठबळ देण्याचे भाजपचे धोरण आहे. संविधान गुंडाळण्याचा त्यांचा कुटील डाव आहे. आपण सर्वांनी मिळून हा डाव हाणून पाडला पाहिजे.
यावेळी शाहू छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, कागल पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयबाबा घोरपडे, शहाजी घोरपडे, मालोजीराव घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. सतेज पाटील म्हणाले, शाहू छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष कसली मागता? किती हा कृतघ्नपणा? निवडणूक लढवा, राजकारण करा, पण शाहू छत्रपतींचा सन्मान राखला पाहिजे. शाहू छत्रपतींच्या विचारकार्याची ओळख पुसण्याचे पाप संजय मंडलिकांनी करू नये. कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही काय केले आणि तुमची पाच वर्षातील अकार्यक्षमता यावर खुली चर्चा होऊ दे. विकासाच्या मुद्यावर कोठेही चर्चा करायला मी तयार आहे.
सभेसाठी नागरिकांची तुडुंब गर्दी झाली होती. ते पाहून पाहून ‘ही सभा लई भारी’ असे उद‍्गार आमदार सतेज पाटील यांनी काढले. सेनापती कापशीमधील सभेने कागलमध्ये ताकत कोणाची, हे सिद्ध झाले आहे. कागलच्या मताधिक्यामुळे निवडणूक शाहू महाराज जिंकणार हे स्पष्ट झाले. पाच लाख मताधिक्यांनी ते निवडून येतील. या खेळात माजी आमदार संजयबाबा घाटगे हे विराट कोहलीच्या भूमिकेत आहेत. निवडणुकीच्या मैदानात माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी जी साथ दिली ती मी आयुष्यभर विसरणार नाही. आजच्या सभेने मला प्रचंड बळ मिळाले असून आता 18 तास काम करणार, असा शब्दही आमदार सतेज पाटील यांनी दिला.
शाहू छत्रपती, माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती उदयबाबा घोरपडे, शहाजी घोरपडे, मालोजी घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी कांबळे, सागर कोंडेकर आदींच्या उपस्थितीमध्ये ही सभा झाली.

 

मुरगूड आणि कागलच्या गैबी चौकात सभा घेणार

महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचाराला सगळीकडे जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सेनापती कापशीनंतर आता मुरगूडमध्येही सभेचे आयोजन केले जाईल. शेवटची सभा कागलमधील गैबी चौकात होईल, असेही सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!