गृहीत धरणार असाल
तर प्रचार नाही असा इशारा देत भाजपच्या नेत्याचा खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारात न उतरण्याचा निर्णय
साडेतीन लाखाचा मी मालक
मला साधा फोन नाही, मग मी कशाला प्रचारात उतरू?
कोल्हापूर, प्रतिनिधी
हातकणंगले मतदारसंघातील मी भाजपचा प्रमुख आहे, यापूर्वी मी उमेदवार म्हणून साडेतीन लाख मते घेतली आहेत, तरीही उमेदवारी मिळाल्यानंतर खासदार जर मला विचारत नसतील, सन्मान देत नसतील तर त्यांचा प्रचार कशाला करू ? असा थेट सवाल करत प्रचा प्रचार न करण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यानी घेतला आहे. यामुळे आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठोपाठ या नव्या नेत्याच्या भूमिकेने माने यांच्या अडचणी वाढणार आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर फटाक्याची आतषबाजी करत प्रचार सुरू झाला. या उमेदवारीला आमदार प्रकाश आवाडे यांनी पूर्वीच उघड विरोध केला होता. माने यांची उमेदवारी जाहीर होतात आवाडे यांचे सुपुत्र राहुल यांनी बंडाचा झेंडा फडकवला. मानेंची उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे. त्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. दोन दिवसात ही भेट होण्याची शक्यता आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर खासदार माने यांच्या विरोधात आणखी एक भाजपचा नेता उघडपणे बोलत आहे. मयूर संघाचे संजय पाटील यांनी ही भूमिका घेतली आहे. भाजपच्या वतीने या मतदार संघातून लढण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने अजूनही ते महायुतीच्या प्रचारात उतरले नाहीत.
माने यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, मी साडेतीन लाखाचा मालक आहे. यापूर्वी मी या मतदारसंघातून निवडणूक लढवली. तेव्हा मला साडेतीन लाख मते पडली. आता उमेदवारी
मानेना मिळाली असली तरी भाजपचा प्रमुख म्हणून त्यांनी साधा मला फोन केला नाही. चर्चा केली नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील भेटले नाहीत. त्यांनाच गरज नसेल तर मी कशाला प्रचार करू?
पाटील म्हणाले, गृहीत धरून वागणार असाल तर परिणाम भोगायलाही तयार राहा. मला उमेदवारी मिळाली नाही, ज्यांना मिळाली ते भेटत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनीच प्रचारात न उतरण्याचा दबाव आपल्यावर आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पाटील यांच्या या भूमिकेने महायुतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.