एआयएसएसएमएस आयओआयटीमध्ये टेनेट २०२४ कार्यक्रमाचे आयोजन
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वतीने ४ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत टेनेट २०२४ हा तीन दिवसीय तंत्रज्ञान महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थी, तंत्रज्ञानातील उत्साही व्यक्ती आणि उद्योगतज्ज्ञांना एकत्र आणून, प्रगत तंत्रज्ञान, चर्चासत्रे आणि विविध स्पर्धांचे आयोजन करणे होता.
कार्यक्रमाची सुरुवात ४ ऑक्टोबर रोजी Tech-Fiesta या उपक्रमाने झाली, ज्यात मर्चंट नेव्हीचे चीफ मरीन इंजिनियर श्री. प्रफुल्ल भाऊराव देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण बाबींचा आढावा घेतला. AI Summit Panel मध्ये श्री. उदय कोठारी, श्री. अतुल मेहेरा आणि श्री. निशांत वेलपुलकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील त्यांचे विचार मांडले. त्यानंतर वेब 3 या विकेंद्रित तंत्रज्ञानावर चर्चा करण्यात आली, ज्यात श्रीमती अलमास सय्यद, श्री. अपूर्व व्यास आणि श्री. विष्णू कोर्डे यांनी सहभाग घेतला.
दुसऱ्या दिवशी IOIT MUN टेनेट २०२४ चे उद्घाटन लेफ्टनंट कर्नल श्री. रंजीतसिंग यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सहा समित्यांमध्ये चर्चा करून वास्तव समस्यांवर उपाययोजना सुचवल्या. याच दिवशी, FIFA आणि BGMI या ईस्पोर्ट्स स्पर्धांनी उपस्थितांचा उत्साह वाढवला.
तिसऱ्या दिवशी E-Summit आयोजित करण्यात आला, ज्यात श्री. सौरभ मंगरुळकर, श्री. श्याम केरकर आणि श्री. चेतन बुलसारी यांनी उद्योजकतेवर चर्चा केली. HR Summit आणि Venture Summit मध्ये मान्यवरांनी गुंतवणूक आणि उद्योजकतेबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मीनाक्षी थलोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. पी. बी. माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. टेनेट २०२४ या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या क्षेत्रात नवीन दिशा दाखवली.