बापूजी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद संस्थेत रविवारी शैक्षणिक धोरणावर व्याख्यान
कोल्हापूर, प्रतिनिधी
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची 106 वी जयंती रविवार दिनांक 9 जून रोजी होणार आहे. यानिमित्ताने संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे शैक्षणिक धोरणावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शैक्षणिक सुधारण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून यंदा मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षकांची भूमिका या विषयावर व्याख्यान होणार आहे.
संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी, संस्थेच्या 13 जिल्ह्यातील 407 शाखांमधून गुरुदेव कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात मुख्याध्यापकांसाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी ,अभ्यासक, विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व सचिव शुभांगी गावडे यांनी केले आहे.