कोल्हापूर उत्तरची उमेदवारी शारंगधर देशमुख यांनाच देण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी
आयर्विन ख्रिश्चन मल्टीपारपज हॉलमध्ये मेळावा संपन्न
कोल्हापूर : उत्तर मतदार संघात समाविष्ट सर्व पेठा युवा मंडळे सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी काँग्रेस पक्षाची नाळ जोडून पक्षाशी एकनिष्ठ राहणारा कार्यकर्ता म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीत शारंगधर देशमुख यांना पक्षाने तिकीट देणे आवश्यक असून त्यांच्या विजयासाठी निश्चितच सर्वसामान्य कार्यकर्ते जीवाचे रान करून निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे मत माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी व्यक्त केले. देशमुख यांना उमेदवारी द्यावीच अशी मागणी यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी केली.
स्थायी समितीचे माजी सभापती काँग्रेसचे पालिकेतील गेटनेते शारंगधर देशमुख यांच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आयर्विन ख्रिश्चन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना गणी आजरेकर यांनी शारंगधर यांच्या नेतृत्वाला वाव देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. योग्यवेळ आता आली असून पक्षाने यावेळी योग्य निर्णय घेतल्यास विजय निश्चित असल्याचे मत व्यक्त केले.
माजी नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत विकासकामांचा धडाका राबविणारा नगरसेवक म्हणून शारंगधर देशमुख यांची ख्याती असल्याने यावेळी पक्षाने त्यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी प्रा जे के पवार माजी नगरसेविका दीपा मगदूम, रिना कांबळे अभिजित चव्हाण माधुरी लाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अर्जुन माने, दिलीप माने, सुजय पोतदार सलीम मुल्ला, भैय्या शेटके धनंजय सावंत यांसह कार्यकर्ते व मान्यवर नागरिक उपस्थित होते.
उत्तरेत कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन वैशिष्ट्य म्हणजे सदर मेळाव्यास माजी नगरसेवक शारंगधर देशमुख उपस्थित न्हवते. उत्तर व दक्षिण मतदार संघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने मेळाव्याचे आयोजन केले होते. उत्तरच्या विकासासाठी आणि सतेज पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी देशमुख यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी सर्वांनीच यावेळी केली.