छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारार्थ संभाजीराजेंचा भुदरगड तालुका दौरा
भुदरगड, प्रतिनिधी :
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवस भुदरगड तालुक्याचा दौरा केला.
आदमापूर येथे संत बाळूमामा मंदिरात दर्शन घेऊन संभाजीराजे यांनी दौऱ्याची सुरुवात केली. या दौऱ्यात संभाजीराजे यांनी के. पी. पाटील यांची मुदाळ येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच, भुदरगड तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन प्रमुख राजकीय मंडळींची व विविध गटांच्या प्रमुखांची भेट घेऊन छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारात सक्रिय होण्याचे आवाहन केले.
गारगोटी येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास संबोधित करताना प्रचाराचे सुयोग्य नियोजन करून प्रत्येक घरापर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन संभाजीराजे यांनी केले.
पाटगाव येथे मौनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन संभाजीराजे यांनी संपर्क दौऱ्यास सुरूवात केली. अनेक गावांमध्ये बैठका व मेळाव्याला संभाजीराजे यांनी संबोधित करत छत्रपती शाहू महाराजांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी कार्यरत होण्याचे आवाहन केले.