- अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या यादीत शिवाजी विद्यापीठाच्या १४ संशोधकांनी स्थान ⁷
कोल्हापूर, : जगभरातील आघाडीच्या दोन टक्के संशोधकांची सन २०२४ साठीची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच (दि. १६ सप्टेंबर) जाहीर केली आहे. यात शिवाजी विद्यापीठाच्या १४ संशोधकांनी स्थान प्राप्त केले आहे. गेली पाच वर्षे सातत्याने शिवाजी विद्यापीठाचे संशोधकीय स्थान जगाच्या नकाशावर हे संशोधक अधोरेखित करीत आहेत, ही अत्यंत समाधानाची व आनंदाची बाब आहे, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान) यांच्यासह निवृत्त प्रा. ए. व्ही. राव (पदार्थविज्ञान), निवृत्त प्रा. सी. एच. भोसले (पदार्थविज्ञान), निवृत्त प्रा. एस. पी. गोविंदवार (जैवरसायनशास्त्र), डॉ. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), डॉ. ए. व्ही. मोहोळकर (पदार्थविज्ञान), डॉ. सागर डेळेकर (रसायनशास्त्र), प्रा. के. एम. गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. टी. डी. डोंगळे (नॅनोसायन्स), डॉ. सुशीलकुमार जाधव (नॅनोसायन्स), डॉ. हेमराज यादव (रसायनशास्त्र) आणि संलग्नित महाविद्यालयांतील संशोधक डॉ. व्ही.एल. पाटील (पदार्थविज्ञान) व डॉ. एस.ए. व्हनाळकर (पदार्थविज्ञान) यांचा समावेश आहे. या संशोधकांचा आज विद्यापीठ कार्यालयात कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते ग्रंथभेट व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कुलगुरू डॉ. शिर्के यावेळी म्हणाले, या संशोधकांना जागतिक यादीमध्ये स्थान मिळण्यामागे त्यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे केलेले संशोधन कारणीभूत आहे. संशोधनाचे व्यसन असल्यामुळेच त्यांना हे यश साधले आहे. विद्यापीठामध्ये या संशोधकांनी संशोधनाची एक शिस्त निर्माण केली, त्याला सर्वच कुलगुरूंनी मोलाची प्रशासकीय साथ दिली. त्यामुळे एक उत्तम संशोधन परंपरा शिवाजी विद्यापीठात निर्माण झाली आहे. हा वारसा नवसंशोधकांनी पुढे घेऊन जाण्यास सिद्ध व्हायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, या १४ संशोधकांव्यतिरिक्त राज्यासह जगभरात अन्य शिक्षण संस्था, विद्यापीठांत कार्यरत असणारे शिवाजी विद्यापीठाचे अनेक माजी विद्यार्थीही या दोन टक्के संशोधकांत समाविष्ट आहेत. ही उज्ज्वल संशोधन परंपरा विद्यापीठाने निर्माण केली आहे. ही पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी भावी पिढीने घेतली पाहिजे.
यावेळी सत्कारमूर्तींच्या वतीने प्रा. सी.एच. भोसले, प्रा. एस.पी. गोविंदवार, प्रा. केशव राजपुरे आणि प्रा. ज्योती जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन या सेक्शन-८ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत यांनी आभार मानले.