सिद्धार्थनगरशी माझं नातं अतूट : राजेश क्षीरसागर सिद्धार्थनगर मधील सभेत नागरिकांना भावनिक साद

Spread the news

सिद्धार्थनगरशी माझं नातं अतूट : राजेश क्षीरसागर

सिद्धार्थनगर मधील सभेत नागरिकांना भावनिक साद

कोल्हापूर, दि. 9 :
सिद्धार्थनगर मधील लोकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. माझे संपूर्ण बालपण शनिवार पेठ, बुधवार पेठेत गेले. बुधवार पेठ आणि सिद्धार्थनगर एकमेकाला लागून असल्याने सहाजिकच येथील लोकांशी माझे पूर्वीपासून आपुलकीचे आणि स्नेहाचे अतूट नाते आहे. म्हणुनच मी येथे भाषण करण्यासाठी नव्हे तर आपल्याशी संवाद साधायला आलोय, अशी भावनिक साद कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी घातली.
सिद्धार्थनगर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगर अध्यक्ष शिवाजीराव जाधव, माजी नगरसेविका सविता जरग, उपजिल्हा प्रमुख किशोर घाडगे, अंकुश निपाणीकर, महिला आघाडी शहर अध्यक्षा पावित्रा रांगणेकर, निशिकांत सरनाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले, मुळात मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. माझी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द विद्यार्थी चळवळीपासून सुरू झाली. काही वर्षांपूर्वी विरोधकांनी मला राजकीयदृष्टय़ा बदनाम करण्यासाठी माझ्यावर विविध आरोप केले. मला दलित विरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला. मी कधीही जात – पात मानली नाही. समाजातील सर्व घटकांतील लोकांशी माझे चांगले संबंध आहेत. दलित चळवळीत काम करणार्‍या अनेकजणांशी माझे ऋणानुबंध आहेत. मी दलित विरोधी असतो तर महापालिकेत काम करणार्‍या 507 पैकी 238 कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी प्रयत्न केले नसते, या परिसरातील विकासकामे केली नसती, कोरोना काळात तुमच्यासाठी धावून आलो नसतो. सत्ता मिळवण्यासाठी तुमच्यात आणि माझ्यात भांडण लावणार्‍या विरोधकांचा डाव ओळखा, असे आवाहन त्यांनी केले.
मी माझ्या आमदारकीच्या काळात तसेच राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून सिद्धार्थनगरमध्ये अनेक विकासकामे उभारली. आगामी काळात परिसरात व्यायामशाळा, समाज मंदिर, बौद्ध विहार उभारण्यात येईल. तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे. तुमच्यासाठी माझे दरवाजे सदैव उघडे आहेत. मला कधीही आवाज द्या, मी धावून येईन, असे भावनिक आवाहन क्षीरसागर यांनी केले.
मी या ठिकाणी भाषण करायला नव्हे तर तुमच्याशी संवाद साधायला आलोय. माझ्याबद्दल गैरसमज दूर करा. माझ्या कामाची दाखल घ्या. आणि मला यापुढेही आपली सेवा करण्याची संधी द्या, असेही राजेश क्षीरसागर यावेळी म्हणाले.
या कोपरा सभेला सिद्धार्थ नगर मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात महिलांचा समावेश अधिक होता. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!