कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे जागा महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. या जागेवर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट ) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गुरुवारी २१ मार्च रोजी कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे आणि शाहू महाराज यांची भेट अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गट या तिन्ही प्रमुख पक्षांनी कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ताकतीने लढविणार असल्याची घोषणा केली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे जागाही महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसला मिळाली आहे. कोल्हापूरच्या जागेसाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्या दृष्टीने तिन्ही पक्षांनी संयुक्तपणे काम करताना दिसत आहेत.
निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूरच्या जागेसाठी प्रयत्न झाले. मात्र जिल्ह्यात काँग्रेस प्रबळ असल्यामुळे आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी प्रभावी मानली गेल्याने शिवसेनेने या जागेवरील दावा सोडला आणि महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसला ही जागा मिळाली. लोकसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या ठिकाणी एकत्रितपणे लोकसभेच्या निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जागा वाटप ही निश्चित केले आहे. दरम्यान ठाकरे हे गुरुवारी कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी ते कोल्हापुरात आल्यानंतर श्रीमंत शाहू महाराजांची भेट घेणार आहेत. यावेळी खासदार संजय राऊत व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित असतील. ठाकरे यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढणार आहे.