फोटो राजमाता प्रचारक नव्हे तर शाहू महाराजांच्या विजयी सभेलाही येणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
कोल्हापूर
महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे, त्यांच्या प्रचाराला तर येणारच शिवाय विजयीसभेलाही येणार असल्याचे सांगतानाच या विजयासाठी शिवसैनिक संपूर्ण ताकतीने मैदानात उतरतील अशी घोषणा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात केली.
ठाकरे यांनी गुरुवारी नवीन राजवाडा येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा केली. यावेळी खासदार संजय राऊत, तेजस ठाकरे, मिलिंद नार्वेकर, आमदार वैभव नाईक, माजी आमदार मालोजीराजे, संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, नितीन बानुगडे पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते. ठाकरे यांनी महाराजांची गळा भेट घेऊन विजयाच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्रात महाविकास आघाडी यासाठी आशीर्वाद ही मागितले.
पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, छत्रपती आणि ठाकरे घराण्याचे ऋणानुबंध अतिशय जुने आहेत. नव्या पिढीतही हे ऋणानुबंध कायम राहतील. शाहू महाराजांची उमेदवारी ही मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने शाहू महाराजांना विजयी करण्याचे वचन मी दिले आहे. त्यामुळे शिवसैनिक त्यांच्या प्रचारात सर्व शक्तीनिशी सहभागी होतील. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करतील करतील. त्यांच्या प्रचाराला मी नक्की येणार आहे आणि विजय सभेलाही.
कोल्हापुरातील न्यू पॅलेस वर ठाकरे आणि शाहू महाराज यांच्यात अर्धा तास चर्चा झाली कोल्हापूरच्या जागेबरोबरच महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी कोण कोणती रणनीती आखली जाऊ शकते याबाबत यावेळी चर्चा झाली.