दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावागावांत विकासात्मक बदल करण्यासाठी अमल महाडिक हेच सक्षम नेतृत्व
शौमिका महाडिक यांचा विश्वास
कोल्हापूर : “राज्यातील महायुती सरकार सर्वसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी काम करत आहे. विविध योजनाद्वारे महिलांना आत्मसन्मान व आत्मविश्वास मिळवून दिला. राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी महायुतीसोबत राहा. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावागावांत विकासात्मक बदल करण्यासाठी अमल महाडिक हेच सक्षम नेतृत्व आहे. त्यांना मोठया मताधिक्क्यांनी निवडून द्या.’’असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.
करवीर तालुक्यातील गिरगाव येथे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ निर्धार सभा आयोजित केली होती. भैरवनाथ मंदिर परिसरात बुधवारी रात्री ही सभा झाली. याप्रसंगी इस्पुर्ली येथील गोविंद पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
‘ ‘सैनिकांचे गाव म्हणून गिरगावची ख्याती आहे. सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे.”असे नमूद करत शौमिका महाडिक म्हणाल्या,‘महायुती सरकार हे नागरिकांच्या भविष्याचा विचार करणारे सारखे आहे. समाजातील सगळया घटकांच्या उन्नतीसाठी योजना आखल्या. मुलींना मोफत शिक्षण, महिलांसाठी लाडकी बहिण योजना, कृषी वीज बिल माफ, महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. लाडक्या बहिण योजनेद्वारे महिलांना सक्षम करत असताना काँग्रेसवाले मात्र योजनेला खोडा घालण्याचा खटाटोप करत आहेत. महायुती चांगल्या विचारांनी काम करत आहे. मात्र काँग्रेसच्या मंडळीकडे नैतिकता नाही. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात विकासकामे न झाल्यामुळे दुष्काळासारखी झाली आहे, काँग्रेसवालेच ही स्थिती मांडत आहेत. यामुळे गावोगावी विकासात्मक बदल करण्यासाठी अमल महाडिक यांना निवडून द्या’
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनिषा वास्कर, माजी सरपंच संध्या पाटील, माजी उपसरपंच संभाजी पाटील, भाजप दक्षिण महिला मोर्चाच्या गौरी पाटील, संपत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना काँग्रेसच्या विद्यमान आमदारांनी मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले. सभेला रामचंद्र कोंडेकर, विक्रम पाटील, शिवाजी कोंडेकर, आनंदा गुरव, यशवंत पाटील आदी उपस्थित होते.