शरण साहित्य अध्यासनासाठी दासोहींकडून देणगीचा ओघ!
शिवाजी विद्यापीठामध्ये शरण साहित्य अध्यासनाची निर्मिती करण्यात आली आहे. नुकताच या अध्यासनच्या कार्यारंभाचा कार्यक्रम शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमात विविध मान्यवरांकडून शरण साहित्य अध्यासानाच्या कॉर्पस निधीसाठी देणगी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज दि. २५ फेब्रुवारी रोजी १,३६,००० /- रुपयांच्या देणगीचे धनादेश कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के आणि प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्याकडे स्वाधीन करण्यात आले.
शरण साहित्य अध्यासनासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी एक लक्ष रूपांची देणगी दिली आली. तसेच शिवशक्ती टूर्सचे शिवानंद पिसे यांच्याकडून अकरा हजार, एस. व्ही. सर्व्हिसेसचे सर्जेराव विभूते यांच्याकडून पंधरा हजार आणि वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे यांच्याकडून दहा हजार रूपांची देणगी अध्यासनासाठी देण्यात आली आहे.
शरण साहित्य अध्यासनच्या माध्यमातून महात्मा बसवण्णा आणि त्यांच्या सहकारी शरण -शरणींच्या जीवन, विचार व कार्याचा अभ्यास केला जाणार आहे. अध्यासनासाठी दिल्या जाणाऱ्या देणग्यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा कॉर्पस निधी जमा करण्याचा अध्यसनाचा मानस आहे. या कॉर्पस निधीमधून शरण- शरणींच्या वचन साहित्याचे संशोधन करणे, त्याचे भाषांतर करून त्याच्या प्रकाशनाचे कार्य केले जाणार आहे. महात्मा बसवण्णा आणि शरणांच्या विचार, कार्याचा प्रसार करण्यासाठी व्याख्यानमाला, परिसंवाद, कार्यशाळा इत्यादींचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शरण तत्वज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांची निर्मिती आणि अध्यापन करण्यात येणार आहे.
सदर देणग्यांचे धनादेश विद्यापीठाकडे स्वाधीन करतेवेळी अध्यासनच्या समन्वयक प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी, यश आंबोळे, सर्जेराव विभूते, शिवानंद पिसे, आर. व्हि. नकाते आदी उपस्थित होते.