मदन कारंडे यांच्यासाठी आज इचलकरंजी धडाडणार शरद पवार यांची तोफ
इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात परिवर्तन जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या
सभेच्या माध्यमातून इचलकरंजीच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे. या सभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
सभेसाठी नाट्यगृह चौक परिसरात विस्तृत तयारी करण्यात आली असून सभेसाठी खास जागा निश्चित करण्यात आली आहे.यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) व काँग्रेस पक्षासह इतर घटक पक्षातील सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करत या सभेला उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार यांची ही सभा केवळ प्रचारासाठी नसून इचलकरंजीच्या विकासाला गती देण्यासाठी, येथील समस्या मांडण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरेल. या सभेमध्ये पवार साहेब खास शैलीत इचलकरंजीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्दे मांडणार आहेत.शहरात या सभेच्या तयारीची चर्चा आहे व नागरिकांमध्येही सभेबाबत उत्सुकता दिसून येत आहे. या सभेत शरद पवार विरोधकांचा कसा समाचार घेतात याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले असून जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही शेवटी उदयसिंह पाटील यांनी केले.यावेळी नितीन कोकणे, शशांक बावचकर, विजय रवंदे, आनंदा कांबळे, प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते.
—