*शेतातील चिखलात उतरत छत्रपती संभाजीराजे व राजू शेट्टी यांचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना खरमरीत प्रत्युत्तर*
कोल्हापूर
छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू व राजू शेट्टी आज नांदेड व परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे नुकसानग्रस्त भागाकडे दुर्लक्ष करून सांस्कृतिक कार्यक्रमांत व्यस्त आहेत अशी टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना मुंडे यांनी शेतातला चिखल सुकल्यावर संभाजीराजे दौऱ्यात गेल्याचे म्हटले होते.
यावर छत्रपती संभाजीराजे व राजू शेट्टी यांनी थेट शेतातील चिखलात उतरत मंत्री मुंडे यांचा दावा खोडून काढत त्यांच्या टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिले आहेत.
यावेळी संभाजीराजे म्हणाले, अतिवृष्टी होऊन आता शेतातला चिखल सुकला असे म्हणून शेतकऱ्यांची कुचेष्टा करणारा असंवेदनशील कृषीमंत्री या राज्याला पहिल्यांदाच लाभलाय ! शेतातला चिखल सुकलाय की नाही हे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली नाचगाणी बघत समजत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष शेतात उतरावे लागते. कृषिमंत्र्यांनी आधी किमान नुकसानग्रस्त भागांना भेटी द्याव्यात, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भरपाई द्यावी आणि मग मोठमोठ्या बाता कराव्यात. अतिवृष्टी होऊन आज आठवडा उलटला तरी शिवारातले पाणी आटलेले नाही. हाताला आलेली पिके कुजून गेलेली आहेत. अशावेळी कृषिमंत्र्यांनी राजकीय आकस ठेवून केलेले वक्तव्य शेतकऱ्यांप्रती त्यांची असंवेदनशीलता दाखविणारे आहे, असे संभाजीराजे म्हणाले.