शक्तिपीठ विरोधात मुंबईत एकवटले हजारो शेतकरी
सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा यलगार”
मुंबई ( प्रतिनिधी )
राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गावर ठाम असल्याने हा महामार्ग शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी तुघलकी निर्णय ठरणार आहे. ज्यापध्दतीने महमद तुघलकाने अनेक विक्षिप्त तुघलकी निर्णय घेऊन प्रजेला वेठीस धरले तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करत असल्याचा घणाघात मुंबई येथील आझाद मैदानात झालेल्या शक्तीपीठ विरोधी मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. दरम्यान, शक्तीपीठाला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध असल्याचे या शक्तिपीठ विरोधी आंदोलनाचे मुख्य निमंत्रक आमदार सतेज पाटील आणि गिरीश कोंडे यांनी सांगितले.
राज्य सरकारने ८६ हजार कोटी रूपये खर्च करून शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास घातलेला आहे. राज्यातील कोणत्याही व्यक्तीने , शेतक-याने किंवा भाविकाने महामार्गाची मागणी केली नाही. सध्या रत्नागिरी -नागपूर हा समांतर महामार्ग अस्तित्वात असून त्या महामार्गावर तुरळक वाहतूक असल्याने तोट्यात चाललेला आहे. तरीही राज्य सरकार शक्तीपीठ करण्यावर ठाम असल्याने यामध्ये राज्य सरकारचा हेतू स्वच्छ दिसत नाही. एकीकडे १ किलोमीटर रस्ता करण्यासाठी सर्वांची टक्केवारी देवून भ्रष्ट्राचार करून ३५ कोटी रूपये खर्च येत असताना शक्तीपीठ मात्र १०७ कोटी रुपयाचा खर्च करण्यात येत आहे. १२ जिल्ह्यातील शेतक-यांचा शक्तीपीठला विरोध असताना सरकार शेतक-यांचा आवाज दाबत आहे.
सध्या राज्य सरकार आर्थिक आरिष्टात सापडले आहे. राज्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने राज्यातील अनेक योजना बंद होवू लागले आहेत.झालेल्या विकासकामांची , जलजीवन योजनेतील पुर्ण झालेल्या कामांची , विविध योजनेतील अनुदानाची , कंत्राटदार यांची हजारो कोटीची बिले थकीत आहेत. सदरची बिले देण्यास सरकार असमर्थ असताना शक्तीपीठ महामार्गाचा कर्जाचा डोंगर जनतेच्या डोक्यावर कशासाठी हवा आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्हा या शक्तीपीठ महामार्गामुळे महापूराच्या भीषण परिस्थितीत सापडणार आहे. औद्योगीक क्षेत्रासह लाखो एकर शेतजमीन व हजारो कुटूंबे यामुळे उध्वस्त होणार आहेत. औदुंबर ते आदमापूर या ७२ किलोमीटर मध्ये जवळपास २० ते २४ किलोमीटर भरावाचा पूल होणार आहे. याबाबत कोणत्याच उपाययोजना रस्ते विकास महामंडळ व राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नाहीत. राज्य सरकार जनतेला व सर्वसामान्य जनतेला अंधारात ठेवून एवढ्या गोष्टी का करत आहे हा संशोधनाचा विषय आहे.
यावेळी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील , आमदार विजय वड्डेटीवार ,आमदार सतेज पाटील , आमदार राजेश विटेकर, आमदार अरूण लाड , आमदार दिलीप सोपल ,आमदार विश्वजीत कदम , आमदार जयंत आसगांवकर , आमदार सचिन आहिर , माजी आमदार संजयबाब घाटगे, के.पी. पाटील, कॅाम्रेड , गिरीश फोंडे , विक्रांत पाटील किणीकर यांनी आदोलनामध्ये सहभागी होऊन पाठींबा दर्शविला आहे.