शक्तीपीठ महामार्ग प्रश्नी सर्वांना विश्वासात घेवू* *सर्वांना विश्वासात घेवूनच शक्तीपीठ महामार्ग प्रश्नातून मार्ग काढू* *शक्तीपीठ महामार्गाविषयी असणारे गैरसमज दूर करू : आमदार राजेश क्षीरसागर*

Spread the news

कोल्हापूर दि.१० : जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने देशाची पाऊल पडत असताना, यात राज्याचा वाटा महत्वाचा असणार आहे. राज्याचा व पर्यायाने देशाचा विकास होण्यासाठी शासन नवनवीन उपाययोजना राबवीत आहे. चांगल्या दळणवळण सुविधा निर्माण झाल्यास औद्योगिक, आय.टी. क्षेत्रासह पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग प्रश्नी सर्वांनाच विश्वासात घेतले जाईल. विरोधाची कारणे जाणून घेवून असणारे गैरसमज दूर केले जातील, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
शक्तीपीठ महामार्ग संदर्भात क्रीडाईच्या वतीने “समज, गैरसमज, गरज” चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश क्षीरसागर होते.
यावेळी प्रास्ताविक करताना क्रीडाईचे अध्यक्ष के.पी.खोत यांनी, राज्यात शासनाच्यावतीने करण्यात येणारा हा महामार्ग जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा असेल. यामुळे जिल्ह्यात रोजगार निर्मितीसह व्यापार वाढीला चालना मिळणार आहे. या महामार्गाबाबत नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा महामार्ग झाल्यास कोल्हापुरात गुंतवणूक वाढीस चालना मिळणार असल्याचे नमूद केले.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, नागपूर – गोवा शक्तीपीठ शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या कामाची माहिती दिली. ते म्हणाले, शक्तीपीठ महामार्गातून राज्यातील १२ जिल्हे जोडले जाणार आहेत. सदर महामार्गामुळे १८ तासांचा प्रवास ८ तासांवर येणार आहे. यामुळे दळणवळणात वाढ होवून पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे. एकीकडे देश विकासाच्या प्रगतीपथावर मार्गक्रमण करत असताना विकासाला चालना देणारे प्रकल्प होणे काळाची गरज आहे. दळणवळण, पर्यटन वाढीचा फायदा जिल्ह्याच्या विकासासाठीच होणार आहे. या प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानी पेक्षा होणारा विकास अधिक पटीने असणार आहे. याचा फायदा स्थानिक नागरिकांनाच होणार आहे. त्यामुळे यात कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. समृद्धी महामार्गाला देखील सुरवातीला विरोध झाला परंतु शासनाने बाधितांना अधिक पटीने मोबदला दिला. आज समृद्धी महामार्गामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात औद्योगिक गुंतवणूक वाढली आहे. परंतु, कोल्हापूरची भौगोलिक स्थिती पूरक असतानाही असे प्रकल्प झाले नसल्याने जिल्ह्याची पीछेहाट झाली आहे. याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. शक्तीपीठ महामार्गाविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. त्यामुळे शक्तीपीठ हा राजकीय मुद्दा न होता सर्वांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहनही यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

*बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचना*
– महामार्ग प्रकल्पात बाधित होणाऱ्यांचे प्राधान्याने पुनर्वसन व्हावे किंवा त्यांना योग्य दराप्रमाणे आर्थिक मोबदला द्यावा.
– महामार्गानजीक व्यापारासाठी प्रयोजन असेल तर त्याठिकाणी प्रकल्पबाधित आणि स्थानिक नागरिकांनाच प्राधान्य द्यावे.
– प्रकल्पाच्या कामात स्थानिक मनुष्यबळाचा वापर प्राधान्याने वापर करावा.
– महामार्गाला सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाची कनेक्टीव्हिटी ठेवावी.
– प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर – शिर्डी, कोल्हापूर – गुजरात सीमा भाग जोडण्यासाठी प्रयत्न करावेत.
– महामार्गामध्ये नद्यांचा संगम क्षेत्र येत असल्याने प्रकल्पामुळे पूरबाधित क्षेत्र वाढून शेतीचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
– महामार्गासंदर्भात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी शासनस्तरावर व्यापक बैठकीचे आयोजन करावे.

या बैठकीस क्रीडाई महाराष्ट्र उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सेक्रेटरी संदीप मिरजकर, संजय शेटे, श्रीकांत पोतनीस, संदीप पाटील, आय.टी.असोसिएशनचे विश्वजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!