शक्तीपीठ महामार्ग व कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर 5 एप्रिल ला एकनाथ शिंदेंना अडवणार: गिरीश फोंडे यांचा इशारा
1 मे महाराष्ट्र दिन रोजी देखील कोणत्याही मंत्र्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज फडकवू देणार नाही असा इशारा
कोल्हापुरात विधानसभा निवडणूक प्रचारावेळी एकनाथ शिंदे यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करतो असे सांगितले तसेच शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर कर्जमाफी देणार असल्याचे देखील आश्वासन दिले . पण आता शेतकऱ्यांच्या या दोन्ही जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर महायुती सरकारने घुमजाव केला आहे. या पार्श्वभूमी वरती आज सर्किट हाऊस मध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीमध्ये बोलताना समितीचे समन्वय गिरीश फोंडे म्हणाले,” एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन सरकार व पक्षाशी गद्दारी केली तेव्हा जनतेने हलकेपणाने घेतले. पण आता शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचे व कर्जमाफीचे आश्वासन देऊन देखील न पाळता शेतकऱ्यांची गद्दारी करत असतील तर कोल्हापुरातील शेतकरी तसेच सामान्य जनता हे सहन करणार नाही. महाराष्ट्रात गेल्यावर्षी २९०० शेतकरी दररोज आठ आत्महत्या केलेल्या असताना विजय मेळावा घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.12 मार्च च्या मुंबई मोर्चा रोजी देखील एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांना आता कोल्हापुरात फिरकू देणार नाही. कुणाल कामरा चे गाणे लावून एकनाथ शिंदे यांचा विरोध होईल”
उभाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले,” महाराष्ट्र युती सरकार हे सातत्याने आंदोलन करणाऱ्यांच्या वरती दडपशाही करत आहे. या दडपशाहीला कोल्हापुरातील जनता भिक घालणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द करून व कर्जमाफीचा आदेश घेऊनच एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरात पाय ठेवावा. अन्यथा कोल्हापुरी हिसक्याला सामोरे जावे.”गोकुळ संचालक प्रकाश पाटील म्हणाले,”निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना आश्वासन देत त्यांचे पालन करणे म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीचे पतन आहे. महाराष्ट्राच्या तिजोरी मध्ये खडखडाट असताना 86 हजार कोटी कर्ज काढून शक्तिपीठ महामार्ग कशाला पाहिजे. या पैशातूनच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. अन्यथा कोल्हापुरात पाय ठेवू नये.”
शिवाजी कांबळे म्हणाले,” सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये सुरा खुपसण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी सरकार एजंट ना पाठीशी धरून महामार्गाला समर्थन असल्याचे भासवत आहे.
कृष्णात पाटील म्हणाले,” एकनाथ शिंदे चे कोल्हापुरातील आमदार हे शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेत शेतकऱ्यांना चितावणी देत आहेत. याला एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे.”
इंडिया आघाडीने देखील शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी 4 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता सर्किट हाऊस येथे मीटिंग बोलवली आहे. त्यामुळे आंदोलनाची व्यापकता वाढणार आहे.
यावेळी शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार सरवडे येथे होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या विजय मेळाव्याच्या शेजारी म्हणजे मुदाळ तिट्टा जवळ शेतकऱ्यांची एक टीम जमेल. दुसऱ्या व तिसऱ्या टीमचा निर्णय वेळप्रसंगी घेऊ.
यावेळी शिवाजी कांबळे, कृष्णात पाटील, सुरेश बन्ने,किसान सभेचे नामदेव पाटील ,दिनकर सूर्यवंशी, प्रकाश पाटील,वृषभ पाटील, तानाजी भोसले, शिवाजी पाटील, सदानंद कदम, युवराज पाटील, जालिंदर कुडाळकर, वाय एन पाटील, मारुती नलवडे, सर्जेराव पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.