शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द केला जाणार
कोल्हापूर
राज्यातील शक्तीपीठ मार्गाची आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. त्याचे तोटे जास्त असल्याने शासकीय पातळीवर मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद लावून हा महामार्ग रद्द केला जाईल, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत दिली.
राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागल्याच्या विषयावर बोलताना मंत्री मुश्रीफ म्ह्णाले, मंत्री छगन भुजबळ यांची खासदार होण्याची इच्छा होती. हे खरे आहे. पण, त्यांना संधी न मिळाल्याने ते नाराज नाहीत. छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे. त्यांच्या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. यामुळे राज्यसभेत जाण्याचा आग्रह मागे घ्यावा अशी विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. राज्यात भाजप मोठा पक्ष असल्याने महायुतीच्या जागा वाटपात विधानसभेला त्यांना जादा जागा मिळणार असल्याचे सांगून ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्या ज्या जागा आहेत त्या त्यांना मिळणारच आहेत. इतर ठिकाणी निवडून येण्याचे मिरीट लक्षात घेऊन चर्चा होऊन जागा मिळतील
मुश्रीफ म्हणाले, ज्यावेळी पराभूत होतो त्यावेळी आमच्यावर धनशक्तीचा आरोप होतो. पण कोल्हापूरमध्ये विजय मिळवल्यानंतर तो लोकांच्यामुळे आणि हातकणंगलेमध्ये पराभव झाला तो धनशक्तीमुळे. हे असे विरोधक म्हणतच असतात, लोकशाहीत ही रूढ झालेली पद्धत आहे