शाहू छत्रपतींचे वलय मोठे, कोल्हापूरच्या प्रगतीचा आलेख आणखी उंचावेल
–आमदार ऋतुराज पाटील
पाचगाव येथील प्रचार मेळाव्याला मोठा प्रतिसाद,
ग्रामस्थांनी दिली मताधिक्क्याची ग्वाही
कोल्हापूर : ‘छत्रपती कुटुंब आणि पाचगाव यांच्यामध्ये वेगळे ऋणानुबंध आहेत.शाहू छत्रपतींचे वलय मोठे आहे. त्यांच्या माध्यमातून
कोल्हापूरच्या चौफेर प्रगतीचा आलेख आणखी उंचावेल’ असा विश्वास कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ पाचगाव, मोरेवाडी येथे सभा झाल्या. पाचगाव येथील लक्ष्मी नारायण
सभागृह येथे झालेल्या प्रचार मेळाव्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उमेदवार शाहू छत्रपती यांचा सरपंच प्रियांका पाटील, उपसरपंच
सचिन पाटील व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पाटील यांनी, ‘पाचगावमधून शाहू छत्रपतींना मताधिक्क्य देऊ’असे
सांगितले.
आमदार पाटील म्हणाले, ‘राजर्षी शाहू महाराजांच्या विचार कार्याचा वसा आणि वारसा घेऊन शाहू छत्रपती काम करत आहेत. शाहू
छत्रपतींचे वलय आणि ताकत मोठी आहे. शहर आणि गावांच्या विकास प्रकल्पासाठी ते एखाद्या मंत्र्यांच्याकडे गेले तर हमखास निधी
मिळणार. प्रस्ताव नाकारण्याचे, निधी देताना हात आखडता घेण्याचे धाडस कोणी करणार नाही.’
शिवसेनेचे उपनेते संजय पवार म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारात कोल्हापुरात शिवसेना कुठेही कमी
नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाहू छत्रपती यांना विजयी करेपर्यंत थांबायचे नाही असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. हात या
चिन्हावर बटण दाबून शाहू छत्रपतींना मतदान करा. संबंध देशात ते सर्वाधिक मतांनी विजयी होतील यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील राहू.
गेल्या वेळी निवडून गेलेले जिल्ह्याचे दोन्ही खासदार विश्वासघातकी निघाले. विश्वासघात करणाऱ्या त्या दोन्ही खासदारांना पराभूत करू. ’
उमेदवार शाहू छत्रपती म्हणाले, ‘कोल्हापूरच्या जनतेने ही उमेदवारी देऊ केली आहे. रयतेचा मी उमेदवार आहे. जनतेच्या कामासाठी
नेहमीच उपलब्ध असेन. साऱ्यांच्या सोबतीने कोल्हापूरचा कायापालट करू. ’ कमर्शियल बँकेचे संचालक युवराज गवळी यांचे भाषण झाले.
कोअर कमिटीचे प्रमुख नारायण गाडगीळ यांनी प्रास्ताविक केले. कोअर कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी
सरपंच संग्राम पाटील यांनी आभार मानले. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, अवधूत साळोखे, तालुकाप्रमुख विराज पाटील, गोकुळचे
संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता गवळी यांच्या प्रमुख
उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला.
……………………………….
मोरेवाडीतील मेळाव्यात शाहू छत्रपतींना पाठिंबा
शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ मोरेवाडी येथे मेळावा झाला. सरपंच ए. व्ही. कांबळे व सदस्यांच्या हस्ते उमेदवार शाहू छत्रपती यांचा सत्कार
झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचने पाठिंबा जाहीर केला. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनिषा वास्कर, दत्ता भिलुगडे, अमर
मोरे, बाबूराव भोसले, आशिष पाटील, ऋषीकेश भिलुगडे आदी उपस्थित होते.