देशात भाजपचा हुकूमशाही कारभार
सौरभ खेडेकर यांची टीका
- संभाजी ब्रिगेडचा शाहू छत्रपतींना पाठिंबा
कोल्हापूर : “भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशामध्ये हुकूमशाही पद्धतीचा कारभार सुरू आहे. या स्थितीमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींना पाठिंबा म्हणजे लोकशाही जिवंत ठेवणे आणि समतावादी विचार पुढे चालवणे होय.”अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर व प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी मांडली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांची संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दुपारी न्यू पॅलेस येथे भेट घेतली. याप्रसंगी युवराज संभाजीराजे उपस्थित होते. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला. निवडणुकी संदर्भात चर्चा केली.
“शाहू छत्रपतींच्या प्रचारात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हिरीरिने सहभागी असतील. देशात आणि राज्यांमध्ये सध्या जे राजकारण सुरू आहे अशा स्थितीमध्ये समतावादी, सुधारणावादी विचाराधारेनुसार काम करणारे व सर्व समाजाच्या विकासाचे ध्येय उराशी बाळगलेल्या शाहू छत्रपती यांच्यासारखे व्यक्तिमत्व संसदेत पोहोचणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व समाजाने शाहू छत्रपतींच्या पाठीशी राहावे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रचारातही आघाडीवर राहील आणि शाहू छत्रपतींच्या विजयी सभेसाठी येतील” असे सौरभ खेडेकर यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, “महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू -आंबेडकर यांची परंपरा आहे. या महापुरुषांचा समतावादी विचार कायम टिकला पाहिजे. यासाठी कोल्हापुरातून शाहू छत्रपती विजयी होणे अत्यावश्यक आहे. संभाजी ब्रिगेडची शिवसेना ठाकरे गटासोबत युती आहे. संभाजी ब्रिगेड हा महाविकास आघाडीचा घटक आहे. या निवडणुकीत शाहू छत्रपतींच्या विजयासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील राहील.”
संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबने म्हणाले,” शाहू छत्रपतींची निवडणुकीला उभे राहण्याची भूमिका ही साऱ्या समाज घटकाला प्रेरणादायी आहे. ”
याप्रसंगी राज्य संघटक मनोज गायकवाड, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील, ऋतुराज पाटील, दिनेश जगदाळे, विवेक मिठारी, राहुल पाटील, योगेश जगदाळे, रणजीत देवणे, आसिफ स्वार, सांगलीचे युवराज शिंदे, महेश भंडारे, प्रवीण पवार , पन्हाळ्याचे शिवाजी घोरपडे, अविनाश आंबी आदी उपस्थित होते.
….
आंबेडकरांच्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी शाहू महाराजांना मतदान करा
जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांचे आवाहन
वंचित आघाडीच्या सर्व विंग्जचा शाहू महाराजांना पाठिंबा
गोरगरीब, पददलित आणि बहुजन समाजाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सक्तीचे प्राथमिक शिक्षण, सर्व जाती धर्मासाठी बोर्डिंग, शेतीसाठी राधानगरी धरणाची उभारणी करुन शेतकरी कष्टकरी आणि वंचित बहुजन समाजाला मानसन्मान दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराजांनी मदत केली. डॉक्टर आंबेडकरांना दिलेल्या मदतीचे ऋण फेडण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या आदेशानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे, असे आवाहन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष संजय गुदगे यांनी केले.
लक्ष्मीपुरी येथील श्रमिक हॉलमध्ये रविवारी दुपारी वंचितच्या कामगार युनियनचा मेळावा झाला. या मेळाव्याला महिलांची संख्या लक्षणीय होती.
पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रशांत वाघमारे म्हणाले, संविधानावर श्रद्धा असणाऱ्या शाहू महाराजांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित आघाडीच्या सर्व शाखा शाहू महाराजांच्या पाठीशी उभ्या राहतील. पैशाच्या आमिषाला बळी न पडता कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून महाराजांना विजयी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करावेत.
मेळाव्याला युनियनचे उपाध्यक्ष समाधान बनसोडे, शहराध्यक्ष भरत कोलारे, जिल्हा संघटक लक्ष्मण तावरे, संभाजी कागलकर, गांधीनगर शहराध्यक्ष प्रमोद सनदी ,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष फरजाना नदाफ, कल्पना शेंडगे, सुहासिनी माने, आदी उपस्थित होत्या प्रभाकर माने यांनी प्रास्ताविक केले तर समाधान बनसोडे यांनी आभार मानले.