सतेज पाटलांनी विकासाच्या मुद्यावर बोलावे, कुठेही चर्चा करण्यासाठी तयार-राजेश क्षीरसागरांचे आव्हान
कोल्हापूर : ’आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासाच्या मुद्यावर बोलावे. त्यांनी मंत्रीपदावर काम करत असताना कोल्हापूरचा
काय विकास केला आणि गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही कोल्हापूरच्या विकासाकरिता काय योगदान दिले,
यासंबंधी बिंदू चौकासह कुठेही चर्चा करायला तयार आहे.’असे खुले आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर
यांनी दिले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारार्थ रविवारी, मंगळवार पेठेतील दैवेज्ञ बोर्डिंग येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा
झाला. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना क्षीरसागर यांनी, ‘महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासासाठी प्रचंड निधी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी
विकासकामांसाठी मंजूर झाला आहे. विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. काही कामे सुरू आहेत. मात्र महाविकास
आघाडीचे नेते मंडळी विकासकामासंबधी लोकांची दिशाभूल करत आहेत. विरोधकांच्या खोटया प्रचाराला कोल्हापूरची जनता भुलणार
नाही.’असा विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय ठरली. कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ झाला. मात्र काँग्रेसचे नेते
मंडळी योजना बंद करण्याची भाषा करत आहेत. आमदार सतेज पाटील हे कोल्हापूरच्या विकासकामासंबंधी दिशाभूल करत आहेत. त्यांनी
मंत्रीपदावर असताना, सत्तेत असताना कोल्हापूरसाठी काय केले ? आणि गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत महायुतीच्या माध्यमातून शहर
विकासाला आम्ही कशी चालना दिली यासंबंधी कुठेही चर्चा करायला तयार आहे.’ असे खुले आव्हान क्षीरसागर यांनी दिले. महायुती
सरकारवर लोकांचा विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मतदार नक्कीच विजयी करतील याविषयी खात्री असल्याचे
क्षीरसागर यांनी सांगितले.
previous post