सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेचा अपमान केल्याबद्दल माफी मागितली का,
खासदार धनंजय महाडिक यांचा रोखठोक सवाल*
*भागीरथी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्याचे सातत्यपूर्ण काम,
स्त्री शक्तीचा विचार आणि कृतीतून होतोय सन्मान,
खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका*
कोल्हापूर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. पण त्यानंतर एका क्षणाचाही विलंब न लावता, समस्त महिला वर्गाची जाहीर माफी मागितली. तरीही विरोधक गेले आठ दिवस टीका करत आहेत. यानिमित्ताने काँग्रेसचे आमदार महिलांच्या मान-सन्मानाच्या बाता मारत आहेत. मात्र आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेचा जाहीरपणे घोर अवमान केला. त्याबद्दल त्यांनी महिलांची माफी मागितली का, असा रोखठोक सवाल, खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला.
भागीरथी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्याचं काम प्रामाणिकपणे केले आहे. त्यामुळं विचार आणि आचारातून स्त्री शक्तीबद्दल आदर आणि सन्मान असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी नमुद केले. गुरुवारी दसरा चौकात झालेल्या महायुतीच्या युवा शक्ती मेळाव्यात ते बोलत होते.
विधानसभा निवडणूक रिंगणातील महायुतीचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक, कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर, करवीरचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारासाठी, गुरुवारी दसरा चौकात महायुतीचा युवा शक्ती मेळावा झाला. यावेळी खासदार महाडिक यांनी भूमिका मांडली. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल बोललेल्या विधानाचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून टीका होत आहे. वास्तविक हसत खेळत सुरू असलेल्या मेळाव्यातील आपल्या विधानाचा विपर्यास झाल्यानंतर, तात्काळ महिलांची जाहीर माफी मागितली. तरीही विरोधकांकडून राजकीय द्वेषातून ठरवून टीका होत आहे. अजुनही लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांना लाभ देण्याची आपण व्यवस्था करु, असे आपले म्हणणे होते. मात्र आमदार सतेज पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला. त्यानंतर महिलांच्या मान-सन्मानाचा मुद्दा उपस्थित करणार्या आमदार सतेज पाटील यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच, छत्रपती घराण्यातील सुनेचा अवमान केला. दम नव्हता तर किंवा माझी ताकद दाखवतो, असे शब्द वापरुन त्यांनी छत्रपती घराण्याचा आणि महिलांचाही घोर अपमान केला आहे. त्यानंतर सतेज पाटील यांनी महिलावर्गाची माफी मागितली का, असा रोखठोक सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला.
महिलांच्या मान-सन्मानाबद्दल काँग्रेस नेत्यांनी आपल्याला शिकवू नये. गेली २० वर्षे भागीरथी महिला संस्थेच्यावतीने, महिला सक्षमीकरणाची चळवळ सुरु आहे. तर कोल्हापूरची पहिली महिला महापौर करण्याची कामगिरीसुध्दा महाडिक कुटुंबियांनी केली होती. आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यातील सुनेचा अवमान करूनही माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार गप्प का आहेत, त्यांचे पित्त अशावेळी खवळत नाही का, असा सवालही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. आजवर महिलांसाठी अनेक सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवले. त्यामुळे महिला वर्गाचा अवमान करण्याचा विचारही कधी मनात आला नाही. केवळ राजकीय विद्वेषातून झालेली टीका दुर्दैवी आहे, असेही खासदार महाडिक म्हणाले.