प्रतिनिधी, कोल्हापूर
मुलीबरोबर केलेला आंतरजातीय विवाह मान्य नसल्याने सासऱ्याने चक्क जावयाचेच अपहरण केले. त्याला एका ठिकाणी कोंडून घालून मारहाण केली. या प्रकरणी अपहरण नाट्यप्रकरणी प्रमुख सूत्रधार श्रीकृष्ण महादेव कोकरे याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी चौघांचा शोध सुरू आहे.
कोल्हापुरातील विशाल अडसूळ याने सहा महिन्यापूर्वी प्रेम विवाह केला. ही मुलगी सांगली जिल्ह्यातील आहे. हा विवाह मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता. दोन दिवसापूर्वी त्यांनी काही साथीदारांच्या मदतीने विशालचे अपहरण केले. त्याला सांगली येथील एका इमारतीत कोंडून ठेवले. याबाबत विशालच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांत दिली. त्यांतर करवीर व कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. तेव्हा विशालच्या सासऱ्यानेच त्याचे अपहरण केल्याचे समजले.
सासरा श्रीकृष्ण कोकरे याने अपहरण केल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली. मिरज येथील एका इमारतीत कोंडून ठेवलेल्या विशालची सुटका केली. त्याला मारहाण केल्याने तो जखमी अवस्थेत होता. त्यास उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपहरण नाट्यप्रकरणी प्रमुख सूत्रधार श्रीकृष्ण महादेव कोकरे याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर आणखी चौघांचा शोध सुरू आहे. या गुन्हाचा तपास पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.