हुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा
सरोज पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर
देशात गेली दहा वर्षे एकाधिरशाही सुरु आहे. सरकारी यंत्रणाचा वापर करुन दडपशाही केली जात आहे. लोकशाही कायम राहण्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. त्यासाठी सर्वांनी सावध राहिले पाहिजे. निवडून येण्यासाठी सत्ताधारी अनेक अमिषे दाखवतील पण त्यांना बळी पडू नका. तुम्ही गप्प राहिला तर संपून जाल. राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कायम टिकवण्यासाठी आणि देशातील हुकुमशाहीची विषवल्ली तोडून टाकण्यासाठी संपूर्ण नारीशक्ती एक होऊन इंडिया आघाडी, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपतींना मोठा फरकाने विजयी करावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील यांनी केले.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केलेल्या महिला निर्धार मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थित महिलांनी शाहू छत्रपतींना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला. मेळाव्याला याज्ञसेनी महाराणी, शांतादेवी पाटील, आमदार जयश्री जाधव, संयोगिता राजे, मधुरिमा राजे यांच्यासह महाविकास आघाडीत सर्व घटक पक्षांच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सरोज पाटील यांनी सत्ताधारी भाजप पक्षाला विषारी वेल, विषारी साप अशा शब्दात टीका करत भाजपच्या जातीय आणि धर्मविरोधी प्रचारापासून आपल्या मुलांबाळांना वाचवण्याची महिलांना दक्ष राहिले पाहिजे असा सल्ला दिला. राजर्षी शाहू महाराजांचे समतावादी विचार वाचवण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडूकीत शाहू छत्रपतींना विजयी करण्याचे आवाहन केले.
मेघा पानसरे म्हणाल्या. ‘कोणत्या विचाराचे सरकार निवडून द्यायचे ही ठरवणारी निवडणूक असून स्वातंत्र्यलढ्यात ज्या प्रमाणे महिला रस्त्यांवर उतरल्या होत्या, त्याप्रमाणे महिलांना संविधान वाचवण्यासाठी, महिलांची सुरक्षितता, महिलांचा सन्मान, महागाई, बेरोजगारी, धर्मजातीमध्ये भांडणे लावण्याऱ्यांच्या विरोधात धाडसाने पुढे आले पाहिजे’.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा पुढे नेणाऱ्या शाहू महाराजांना निवडून देण्यासाठी महिला शक्तीची ताकद दाखवूया असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
इतिहास अभ्यासक मंजूषा पवार म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराजांच्या वंशात जन्मलेल्या शाहू छत्रपतींनी आपल्या पूर्वजांचा थोर विचार कायम जोपासला आहे. समतेचा विचार, कोल्हापूरी बाणा शाहू छत्रपतींनी जपला आहे. दिल्लीश्ररापुढे झुकायचे नाही हा चारशे वर्षापूर्वीचा इतिहास पुन्हा निर्माण झाला आहे. शाहूंचा वैचारिक वारसा, निष्कलंक चारित्र्य, लोकांच्या मनातील राजा अशी प्रतिमा जनतेच्या मनात निर्माण करणारे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपतींना विजयी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या. ‘आठरापगड जाती, महिलांची उन्नती, शेती, राधानगरी धरण, उद्योगधंद्याला चालना देऊन कोल्हापूर जिल्ह्याला राजर्षी शाहू महाराजांनी समृद्ध केले. राजर्षी शाहू महाराजांचे ऋणातून उतराई होण्याची वेळ आली आहे. शाहू छत्रपतींना विजयासाठी सर्वांनी एकदिलाने काम करुया’
पद्मजा तिवले म्हणाल्या. ‘गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने देशाचा कारभार करताना विरोधी पक्षांला सन्मानाची वागणूक दिली. पण गेल्या दहा वर्षात भाजप द्वेषाचे, सुडाचे राजकारण करत आहे. उद्योजकांची कोट्यवधी रुपयांची कर्जे माफ केली जातात पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही. जाती धर्मात भांडणे लावून देशाची एकता धोक्यात आणणाऱ्या भाजपच्या विरोधात इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपतींना भारी मताधिक्यांने विजयी करुया’.
महिला सबला व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या शाहू महाराजांचा वारसा आणि दुसरीकडे महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्या सरंक्षण देणारे सत्ताधारी अशी ही निवडणूक असून काँग्रेसच्या शाहू छत्रपतींना विजयी करण्याचे आवाहन अॅड कल्पना माने यांनी केले.
यावेळी काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या घोटणे, शिवसेनेच्या प्रतिज्ञा उत्तुरे, समृध्दी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार माजी नगरसेविका पूजा नाईकनवरे यांनी मानले. प्रारंभी सागरगीत मंचच्या कलकारांनी ‘आता उठवू सारे रान’ हे समूहगीत सादर केले.
व्यासपीठावर काँग्रेसच्या माजी महापौर वंदना बुचडे, स्वाती यवलुजे, शोभा बोंद्रे, वैशाली डकरे, निलोफर आजरेकर, काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्या सरलाताई पाटील, माजी नगरसेविका सुलोचना नाईकवाडे, भारती पोवार, जयश्री चव्हाण, माधुरी लाड, उमा बनछाडे, अश्विनी बारामते, वृषाली कदम, तेजस्विनी पाटील, दश्मिता जाधव, शिवसेनेच्या शुभांगी पोवार, स्मिता मांडरे , जिल्हा बँक संचालिका मनिषा गवळी, राष्ट्रवादीच्या कल्पना माने यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.