संस्कार, नितीमूल्ये – परंपरेचा सुरेख मिलाफ घडवत सारस्वत समाजाने भारतीयत्व जपले – अभिनेत्री निशिगंधा वाड देऊलकर

Spread the news

संस्कार, नितीमूल्ये – परंपरेचा सुरेख मिलाफ घडवत सारस्वत समाजाने भारतीयत्व जपले – अभिनेत्री निशिगंधा वाड देऊलकर

सारस्वत विकास मंडळाचा सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभ दिमाखात, गौरव ग्रंथाचे प्रकाशन, मान्यवरांचा सत्कार

कोल्हापूर : ‘संस्कार, नितीमूल्ये आणि परंपरेचा सुरेख मिलाफ घडवित सारस्वत समाजाने भारतीयत्व जपले आहे. लोकांसाठी आणि देशासाठी समर्पित वृत्तीने कार्य करताना या समाजाने सत्कार्याचा सुर्योदय घडविला.’ असे कौतकोद्गार प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड देऊलकर यांनी काढले. येथील सारस्वत विकास मंडळाचा सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती समारंभ रविवारी दि. २० एप्रिल २०२५ रोजी दिमाखात पार पडला. या समारंभासाठी अभिनेत्री निशिगंधा वाड देऊलकर व अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक दीपक देऊलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. किर्तने अँड पंडित चार्टर्ड अकौटंट्सचे मॅनेजिंग पार्टनर सीए संदीप वेलिंग हे प्रमुख अतिथी तर ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉ. अजित गुंजीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. व्यासपीठावर सारस्वत विद्यार्थी वसतिगृहाचे अध्यक्ष मोहन देशपांडे, सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर, सचिव मुकुंद कुलकर्णी, खजिनदार गुरुनाथ देशपांडे, सारस्वत विद्यार्थी वसतिगृहाचे उपाध्यक्ष व सुवर्ण महोत्सव संयोजन समितीचे समन्यवक सिद्धार्थ लाटकर, सारस्वत विद्यार्थी वसतिगृहाचे मानद सचिव सुधीर कुलकर्णी, सहसचिव अमित सलगर, सारस्वत विकास मंडळाचे विश्वस्त गिरीश घोलकर, सुनिल होळणकर, दिपक देशपांडे, माधवी देशपांडे, विठ्ठल कुलकर्णी, सचिन शानभाग, शंतनू पै, हर्षांक हरळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सायबर इन्स्टिट्यूट येथील आनंद भवन सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सारस्वत विकास मंडळाच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीवर आधारित गौरव ग्रंथांचे प्रकाशन झाले. तसेच संस्थेसाठी योगदान दिलेल्या मान्यवर व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन समारंभाचे उद्घाटन झाले. यानंतर प्रसिद्ध लेखक मयुरेश पाडगांवकर यांनी, अभिनेत्री निशिगंधा वाड देऊलकर व अभिनेते दीपक देऊलकर या दांपत्यांची प्रकट मुलाखत घेतली. जवळपास दीड तासाच्या मुलाखतीतून या दोन्ही कलाकारांचा सिनेमा, नाटक या क्षेत्रातील कलाप्रवासासह सहजीवनही उलगडले. ‘कलाकार म्हणून जी जडणघडण झाली त्यामध्ये कोल्हापूरचा खूप मोठा वाटा आहे. येथील अनुभव जीवन समृद्ध करणारे, आयुष्य श्रीमंत बनविणारे होते. हे ऋण फेडता येणार नाहीत’ अशी कृतज्ञता निशिगंधा वाड यांनी व्यक्त केली. तर दीपक देऊलकर यांनी ‘१९८८ ते २००१ या कालावधीत कोल्हापूर हे आमचं फर्स्ट होम बनले होते. कारण वर्षातील ३६५ दिवसापैकी २८० दिवस आम्ही शूटिंगनिमित्त कोल्हापुरात असायचो. कोल्हापूरची रांगडी माती आणि प्रेमळ स्वभाव आपलासा वाटतो.’ अशा
शब्दांत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुलाखतीच्या ओघात वाड यांनी, ‘मातृभाषेत आईच्या दुधाची गोडी असते’ असे नमूद करताच संपूर्ण सभागृहात टाळयांचा गजर झाला. सिनेमा, नाटक, मालिकेतील अनुभव शेअर करताना दोघांची प्रेमकहाणी ते लग्नापर्यंतचा प्रवासही उपस्थितांशी शेअर केला.
१५० हून अधिक मराठी हिंदी सिनेमे, असंख्या मालिका आणि नाटकातून अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे लेखन प्रेम आणि संशोधनवृत्तीचे दर्शन यानिमित्ताने घडले. वेगवेगळया तीन विषयात त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. अभिनय प्रवासाविषयी त्या म्हणाल्या, ‘१९८७ पासून कलाक्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. शालेय जीवनाताच नाटकाची गोडी लागली होती. आई डॉ. विजया वाड या मराठी विषयाच्या प्राध्यापिका तर वडील आर्मी ऑफिसर, त्यांचा पाकीस्तानाच्या युद्धात सहभाग होता. त्यावेळी ते २१ दिवस बंकरमध्ये होते. वडील जात पात मानत नव्हते. आपण सारे भारतीय ही त्यांची भावना. या वातावरणात मी वाढले. शिक्षणाची आस आणि संस्काराची नाळ कधी तुटली नाही. जात ही जन्माने नव्हे तर जगण्याने सिद्ध होते. आयुष्याच्या विद्यापीठात आपण कसे जगतो, यश अपयश कसे पचवतो, इतरांशी आपला माणूस म्हणून कसे वागतो यावर माणूसपण ठरत असते. जगताना माणसाने मयुराच्या पिसाऱ्यासारखं फुलावं.’
अभिनेता दीपक देऊलकर यांनी क्रिकेट हे माझे पॅशन होते असे नमूद करत मुंबईतील चिखलवाडीतील किस्से ऐकिवले. १९ वर्षाखालील मुंबई संघातून क्रिकेट खेळलेल्या दीपकने नाटक, मालिका, सिनेमा आणि दूरदर्शन मालिका हा सारा प्रवास खूप रोमांचक, अनुभवसंपन्न होता असे सांगितले. रामानंद सागर यांच्या कृष्णा मालिकेतील बलरामाची भूमिका, कमलाकार सारंग, जयवंत दळवी यांनी एकत्र येऊन केलेल्या सिनेमाची निर्मिती, निशिगंधा वाड यांच्यासोबत केलेले सिनेमे यातील किस्से ऐकवित मुलाखतीचा कार्यक्रम गाजविला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजित गुंजीकर यांनी ‘सारस्वत समाज हा दातृत्वशील आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व क्रीडा क्षेत्रात सारस्वत विकास मंडळाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध राज्यात सारस्वत समाज हा समाजजीवनाशी एकरुप होऊन देशासाठी योगदान देत आहे.’ विशेष अतिथी सीए संदीप वेलिंग म्हणाले, ‘सारस्वत विकास मंडळाची पन्नास वर्षाची वाटचाल ही प्रेरणादायी आहे. समाजबांधवांनी व्यक्तिगत व संस्थात्मक पातळीवर अत्युच्च कामगिरी केली आहे. स्वत:मधील कौशल्यांचा विकास, नवतंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रत्येकाने समाज व देश बांधणीसाठी योगदान द्यावे, त्यादृष्टीने भविष्याची वाटचाल असावी.’ कार्यक्रमाची सुरुवात नम्रता कामत व पूजा कामत यांच्या सरस्वती वंदन गायनाने झाली. सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन जनवाडकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पत्रकार समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धार्थ लाटकर यांनी आभार मानले.

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!