केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे व्यापार, उद्योग अडचणीत संजय शेटे यांचा आरोप कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी शाहू महाराज खासदार व्हावेत : उद्योजकांच्या भावना

Spread the news

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे व्यापार, उद्योग अडचणीत

संजय शेटे यांचा आरोप

कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी शाहू महाराज खासदार व्हावेत : उद्योजकांच्या भावना

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व्यापार, उद्योग अडचणीत आले आहेत. ही अडचण दूर करायची असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येता कामा नये, यासाठी महायुतीला सत्तेपासून रोखा असा हल्लाबोल कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केला.

 

कोल्हापुरातील कित्येक वर्ष प्रलंबित असलेले उद्योग क्षेत्राचे प्रश्न शाहू महाराज खासदार म्हणून निश्चित सोडवतील असा विश्वास अनेक उद्योजक व व्यापारी यांनी व्यक्त केला. ‘उद्योग जगताची सद्यस्थिती आणि पुढील धोरण’ याबाबत कोल्हापुरातील व्यापारी उद्योग संघटनाच्या वतीने आयोजित ‘उद्योजक मीट’ कार्यक्रम घेण्यात आला. जिल्ह्यातील उद्योजक शाहू महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना खासदार करणार असल्याच्या निर्धार व्यक्त करण्यात आला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजेछत्रपती, यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या बुधले हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात अनेक उद्योजकांनी केंद्र सरकारचे औद्योगिक धोरण, कर प्रणाली, छोट्या उद्योगाकडे असलेले दुर्लक्ष तसेच कोल्हापुरातील उद्योग वाढीसाठी जागा, वीजदर, रेल्वे, विमान सेवा, रस्ते, हद्दवाढ या प्रलंबित प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. राजर्षी शाहू महाराजांनी 1960 साली शाहू मील च्या माध्यमातून कोल्हापूर उद्योग क्षेत्राची पायाभरणी केली. आणि त्यानंतर छत्रपती घराण्याने उद्योग क्षेत्राला चालना दिली. म्हणूनच आज कोल्हापुरातील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज केली आहे. पण गेल्या दहा वर्षात मात्र व्यापार उद्योग अडचणीत आले आहेत. स्थानिक प्रलंबित प्रश्नामुळे कोल्हापुरातील उद्योग वाढ ठप्प झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शाहू महाराजांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवू या असे आवाहन अनेकांनी केले.

यावेळी आमदार सतेज पाटील यांनी व्यापार उद्योग क्षेत्राची गेल्या पाच वर्षात परिस्थितीत जास्त बिघडली आहे. व्यापार, उद्योग क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी दूरदृष्टी असणारे शाहू महाराज दिल्लीत खासदार म्हणून गेले पाहिजेत. राजर्षी शाहू महाराजांनी मिरजेतून रेल्वे आणली.राधानगरी धरण बांधले, राजाराम महाराजांनी विमानतळ सुरू केले. त्यामुळे कोल्हापुरात उद्योग व्यवसायाला भरभराट आली. हे ऋण आपल्याला विसरता येणार नाही. या कर्तृत्वान कुटुंबाच्या मागे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे असे आवाहन केले.

माजी आमदार मालोजीराजे म्हणाले की, कोल्हापूरच्या उद्योग व्यवसायाच्या प्रश्नांची शाहू महाराजांना चांगली जाण आहे. त्यांच्या अभ्यासूवृत्तीचा उद्योग क्षेत्राला निश्चितच लाभ होणार आहे. हे प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास करून, तज्ञांशी चर्चा करून आपले मत व्यक्त करतात. शाहू महाराजांना कोल्हापुराचे खासदार म्हणून दिल्लीत निश्चितच मोठा मान असेल. त्यांच्या प्रत्येक कृतीचा तेथे प्रभाव पडणार आहे. म्हणूनच त्यांना दिल्लीत खासदार म्हणून पाठवावे आणि आपले उद्योग क्षेत्राचे प्रश्न मार्गी लावावे.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या की, महाराष्ट्रातील उद्योग बाहेरच्या राज्यात जात आहेत. त्याचा परिणाम येथील उद्योगांवर होत आहे याचा विचार उद्योजकांनी करावा.

यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे यांनी केंद्र सरकार धोरण औद्योगिक क्षेत्राला अडचणीत आणणारे असल्याचे सांगितले. यावेळी आनंद माने, दिनेश बुधले रामराजे बदाले यांच्यासह अनेक उद्योजकांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाहू महाराजांना पाठिंबा दिला.

यावेळी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन,कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, प्रदिपभाई कापडिया, आनंद माने, राजू पाटील, भरत पाटील, सुरेश चौगुले, अजय सप्रे,संजय भगत, तौफिक मुलाणी, संजय राठोड, मोहन मुल्हेरकर, डी. डी. पाटील, भरत पाटील, सचिन शिरगांवकर, बाबासो कोळेकर नितीन दलवाई शांताराम सुर्वे सुभाष जाधव आदिंसह उद्योजक, व्यापारी उपस्थित होते


Spread the news

You may also like

error: Content is protected !!