मंडलिकाना महायुतीची उमेदवारी नको, दिला तर प्रचार करणार नाही
संग्रामसिंह कुपेकर यांची भूमिका
कोल्हापूर /प्रतिनिधी
‘कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी देऊ नये; त्यांना दिल्यास आम्ही प्रचार करणार नाही’ अशी विरोधी भूमिका भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी घेतली आहे. भाजपमधूनच मंडलिकांना उघड विरोध करण्याची सुरुवात झाल्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चंदगड तालुक्यातील हसुरचंपू येथील बुथप्रमुखांच्या मेळाव्यात कुपेकर यांनी खासदार मंडलिक यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेल्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना विरोध करून आमची मोठी चूक झाली. गेल्यावेळी मंडलिक यांचा आम्ही प्रचार केला. डोके फोडून घेतले. विजयानंतर मात्र मंडलिक यांनी कोणत्याही गावाशी संपर्क ठेवला नाही. कामे केली नाहीत. त्यामुळे त्यांना यावेळी उमेदवारी देऊ नये; दुसरा कोणीही उमेदवार चालेल. परंतु, तो भाजपच्या चिन्हावर लढणारा हवा असेही ते म्हणाले.
चंदगड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीतच कुपेकरांनी मंडलिकांना विरोध केला. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आम्ही कितीही सांगितलं तरी, लोक मतं देणार नाहीत, आणि दगा फटका झाला तर भाजपने आमच्यावर ठपका ठेवायला नको असे सांगून ते म्हणाले, मंडलिकांना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचारही करणार नाही. त्यांना उमेदवारी देऊ नये, म्हणून वरिष्ठांना आपण सांगणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी अथवा प्रमुखांनी अशा प्रकारची विधाने करू नयेत अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे.
….