*विकासकामांचा डोंगर उभारल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पालकमंत्र्यांना लिंबू अंगारा व भानामतीसारखे प्रकार का करावे लागतात?:समरजितसिंह घाटगे*
*अशा प्रकारांना नागरिकांनी भीक न घालता निर्भयपणे मतदानाचे केले आवाहन*
उत्तुर/ प्रतिनिधी
गेली पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या व विकासकामांचा डोंगर उभारल्याचा डांगोरा पिटणाऱ्या पालकमंत्र्यांना लिंबू-अंगारा व भानामतीसारखे प्रकार का करावे लागतात? असा परखड सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी उपस्थित केला. तर अशा प्रकारांना नागरिकांनी भीक न घालता निर्भयपणे मतदान करावे.असे आवाहनही त्यांनी केले.
मडिलगे (ता.आजरा) येथे प्रचार सभेत ते बोलत होते.मुरगुडनंतर जैन्याळमध्ये झालेल्या भानामतीच्या प्रकाराचा घाटगे यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
घाटगे पुढे म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीत मतदानासाठी नागरिकांच्या शपथा घेतल्या जात आहेत. लिंबु-अंगारा टाकून भानामतीचे अत्यंत घृणास्पद नागरिकांत भिती पसरविण्याचा प्रकार सुरू आहे.शासकीय योजना बंद करण्याच्या धमक्या माता-भगिनींसह लाभार्थ्यांना दिल्या जात आहेत.विरोधकांच्या या लाजिरवाण्या कृत्यातून शिव,शाहु,फुले,आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना तिलांजली दिली जात आहे. स्वाभिमानी जनता अशा विचारणा व कृत्यांना थारा देणार नाही.
राष्ट्रीय काँग्रेसचे ॲड.सुरेश कुराडे म्हणाले, स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर, सदाशिवराव मंडलिक,विक्रमसिंह घाटगे, श्रीपतराव शिंदे शामराव पाटील आणि देशाचे नेते शरद पवार यांना फसवण्याची फार मोठी गद्दारीची परंपरा पालकमंत्री मुश्रीफ यांची आहे.त्यामुळे त्यांची पाठराखण करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वेळीच सावध व्हावे.
यावेळी संभाजी भोकरे,केरबा पाटील,संजय शिंदे,मारुती येसने,शिवराज मोहिते,शिवाजी गुरव,सुरेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी कृष्णा हसबे,युवराज जाधव, भिवा गुरव,आनंद येसने,मारुती येसने,निवृत्ती पाटील,बचाराम पाटील,अभिजीत मोहिते, विश्वास भाईंगडे,कुंडलिक डोंगरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते…
स्वागत विजय परळकर यांनी केले. आभार विश्वजीत मुंज यांनी मानले.
चौकट
शिवरायांची आण घेऊन मुश्रीफांचा
पराभव करा-अरबाज शेख
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अरबाज शेख म्हणाले,हसन मुश्रीफ यांनी शासकीय निधी व योजनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.एका घरकुलावर तीन-तीन वेळा हा माणूस पैसा उचलत सुटला आहे. मर्जीतील मोजक्या चार कंत्राटदारांना पोसले आहे. केवळ रस्ते-गटर्स म्हणजे म्हणजे विकास अशी धारणा असलेल्या पालकमंत्र्यांचा शिवरायांची आण घेऊन पराभव करा.
छायाचित्र-मडिलगे ता.आजरा येथे प्रचार सभेत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे समोर मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय.