समरजित घाटगेंचा ३ सप्टेंबरला राष्ट्रवादीत प्रवेश
कोल्हापूर
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी अखेर भाजपला रामराम केला. ते आता ३ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी झालेल्या मेळाव्यात केली. वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतो, तो डाव शरद पवार हे तीन तारखेला जाहीर करतील असेही पाटील यांनी सांगितले. घाटगे यांच्या नव्या निर्णयाने महायुतीला जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.
महायुतीच्या जागा वाटपात कागल विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारीच जाहीर केली. यामुळे महायुतीतून उमेदवारी मिळणार नाही, याची खात्री झाल्यानंतर घाटगे यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. शुक्रवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांच्या भावना समजावून घेतल्या. कार्यकर्त्यांनी पवार गटात जाण्याचा आग्रह केला. त्यानुसार त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेळाव्याच्या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. घाटगे यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढणार आहे. वस्ताद नेहमी एक डाव राखून असतात. शरद पवार हे वस्ताद आहेत. येत्या तीन तारखेला ते डाव टाकतील अशी घोषणाच पाटील यांनी केली. दरम्यान, कागल येथील गैबी चौकात घाटगे यांचा पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.