इनामदार यांचा सत्कार म्हणजे विद्याज्ञानाच्या मंगल परंपरेचा सन्मान
प्रा. प्रकाश इनामदार यांचा अमृत महोत्सवी गौरव समारंभ उत्साहात
कोल्हापूर
लेखक, दिग्दर्शक, अनुवादकार प्रा. प्रकाश इनामदार यांचा सत्कार म्हणजे विद्याज्ञानाच्या मंगल परंपरेचा सन्मान आहे असे गौरवौद्गार सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. नंदकुमार जोशी यांनी काढले. इतिहासाचे अभ्यासक, लेखक प्रा. इनामदार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस मराठी कवी लेखक संघटना, करवीर वाचन मंदिर आणि इनामदार यांच्या विद्यार्थ्यांनी विशेष सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार जयंत आसगावकर होते.
डॉ. जोशी म्ह्णाले, भारतीय संस्कृतीत गुरूला अतिशय महत्त्व आहे. गुरू हा शिष्याला सन्मार्गाला नेतो.प्रा. इनामदार हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची आजही ओळख आहे. इतिहास विषय शिकवताना इतिहासातील प्रसंग ते डोळ्यासमोर उभे करत. यामुळे आजही त्यांच्याबाबत कौतुक होते.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्रीराम पचिंद्रे म्हणाले, वयाची पंच्याहत्तरी ही आयुष्याचे अमृत असते. अमृताची प्राप्ती होईपर्यंत काम करायचे असते.
आमदार आसगावकर म्ह्णाले, प्रा. इनामदार यांचा अमृतमहोत्सवी सत्कार हा त्यांच्या ज्ञानाचा गौरव आहे. ते खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आहेत.
प्रारंभी प्रा. इनामदार यांचा डॉ. जोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. ग्रंथपाल मनीषा शेणई यांच्या हस्ते सौ. प्रभावती इनामदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. मिलींद पोतदार, रवींद्र ताम्ह्णकर, प्रा. दयानंद देवमोरे,राहूल कुलकर्णी, आर्या बांदिवडेकर आदिंची भाषणे झाली. प्रा. इनामदार यांच्यावर प्रा. झावरे यांनी तयार केलेली चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
दरम्यान, प्रा. इनामदार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ लेखक, प्राचार्य जी.पी. माळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सौ. पार्वती माळी उपस्थित होत्या.