सचिनचा ग्रेटनेस, धोनीचा सकारात्मक दृष्टिकोन* -ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन नेले यांचा डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद

Spread the news

कसबा बावडा

येथील डॉ. डी .वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये जेष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. सचिन तेंडुलकरचा ग्रेटनेस, वडिलांच्या निधनानंतर पुन्हा देशासाठी वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेल्या सचिनची झालेली घालमेल, महेंद्रसिंग धोनीचा क्रिकेट आणि खेळाबद्दलचा तसेच जीवनाकडे बघण्याचा अप्रोच, विराट कोहली ,रोहित शर्मा या खेळाडूंनी यशापर्यंत पोहोचण्यासाठी ठेवलेली शिस्त, जसप्रीत बुमराचा खडतर प्रवास आणि खेळाचे जीवनातील स्थान अशा गोष्टी तासभर ओघवत्या वाणीमध्ये सांगून लेले यांनी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले.

लेले पुढे म्हणाले, क्रिकेट हा समजायला, उमगायला आणि खेळायला सुद्धा अवघड आहे. मैदानावर उतरल्यानंतर कसोटी लागते. क्रिकेटमध्ये प्रचंड कष्ट करूनही यश मिळेलच असे नाही. त्यासाठी भरपूर मेहनत व वेळही द्यावा लागतो. आपल्याला एखाद्या खेळाडूची यश दिसते पण त्या मागचं खडतर आयुष्य दिसत नाही.

वडिलांच्या निधनानंतर दुःख बाजूला ठेवून देशासाठी विश्वचषक खेळायला पुन्हा संघात सामील होताना रडून सुजलेले डोळे कोणाला दिसू नयेत म्हणून सचिनने गॉगल घातला होता ,असे ही त्यांनी नमूद केले.
भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडूलकर हा बाप असून राहूल द्रविड ही आई असल्याचे त्यांनी संगितले. आजच्या विद्यार्थ्यांना मोबाईल आणि सोशल मीडियापासून जरा जरी लांब गेले तरी अस्वस्थ वाटते. पण धोनीसारखा महान खेळाडू मोबाईल कुठेतरी लांब ठेवून आनंदी जीवन जगत असतो.

अडचणीच्या काळात जो मदत करतो त्याची आठवण नेहमी ठेवा. यासाठी विद्यार्थी दशेत मित्र जोडा, असा सल्लाही लेले यांनी विद्यार्थांन दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सुनंदन लेले यांनी दिलखुलास उत्तरे दिली .

यावेळी प्राचार्य डॉ.महादेव नरके, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजीत भोसले, तेंडल्याचे दिग्दर्शक सचिन जाधव, मेधप्रणव पवार, प्रा.नितीन माळी,प्रा.महेश रेणके उपस्थित होते. प्रा.अक्षय करपे, प्रा.सूरज जाधव आणि जिमखाना विभागाने या कार्यक्रमाचे नियोजन केले.

*फोटो ओळी*
डॉ.डी. वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले.
सोबत प्राचार्य डॉ.महादेव नरके, अभिजीत भोसले ,सचिन जाधव आदी.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!