पूरग्रस्त कुंभार समाजाला त्वरित मदत मिळावी भाजपाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन
भाजपा शिष्टमंडळाच्या वतीने पूरग्रस्त कुंभार वसाहत बापट कॅम्प येथे पाहणी
कोल्हापूर दि.२६ भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली संत गोरा कुंभार वसाहत (बापट कॅम्प) येथे पूर परिस्थितीची पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर पूरग्रस्त कुंभार समाजाला त्वरित मदत मिळावी यासंदर्भात निवासी जिल्हाधिकारी श्री. संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, सत्यजित उर्फ नाना कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत संकपाळ यांची भेट घेऊन सध्या चालू असलेल्या आपत्ती व्यवस्थापने बद्दल सखोल माहिती घेतली. सध्या बघितले तर राधानगरी धरणातील प्रवाह बघता चालू काही तासात अजून २ फूट पाण्याची पातळी वाढू शकण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनेकडून पूरग्रस्त नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे कि बोटी मधून कोणाला काढायला लागू नये पुराची स्थिती बघता अगोदरच स्तलांतरित व्हावे याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्त नागरिकांसाठी चित्रदुर्ग मठ, दसरा चौक याठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर पूर भागातील काही हॉस्पिटल असतील त्यांच्या स्थलांतरासाठी सीपीआर रुग्णालय, सेवा रुग्णालय, क.बावडा, सावित्रीबाई फुले याठिकाणी बेड राखीव ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोल्हापूर शहरात संत गोरा कुंभार वसाहत (बापट कॅम्प), शाहूपुरी कुंभार गल्ली परिसर अशा विविध ठिकाणी पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरून प्रचंड नुकसान होत असते. यातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत त्याचबरोबर पावसाचा जोर कायम राहिल्यास याभागात पाणी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी या उद्देशाने आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी बापट कॅम्प याठिकाणी जाऊन नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे त्याचबरोबर सतर्क राहण्याचे आवाहन केले, पाणी आपल्या दारापर्यंत येण्याची वाट न पाहता लवकरात लवकर स्थलांतर करून होणारी वित्त हानी टाळावी असेही सांगितले. त्याचबरोबर नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पूर परिस्थतीमध्ये मदतीसाठी आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही याप्रसंगी नागरिकांना दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी संत गोरा कुंभार वसाहत (बापट कॅम्प) येथील नागरिकांना आपल्या गणेश मूर्ती, घरगुती, दुकानाचे साहित्य सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करून घेऊन काही मदत लागली तर भारतीय जनता पार्टी तत्पर असल्याचे सांगितले. त्याचबरोबर काही अडचणी आल्या तर स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्याकडे संपर्क करण्याचे सांगितले.
महापुराचा सर्वात पहिला फटका संत गोरा कुंभार वसाहत (बापट कॅम्प) व शाहूपुरी येथील कुंभार समाजाला मोठ्या प्रमाणात बसतो. २०१९ व २०२१ साली कुंभार समाजाचे मोठे नुकसान झाले होते तशीच काही अवस्था आता देखील दिसून येत आहे. कुंभार समाजाचे लहान व मोठे गणपती मूर्ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असून पुरामुळे त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे गरजेचे आहे. त्यासाठी मार्केट यार्ड बाजार समिती मधील काही गोडाऊन गणपती ठेवण्यासाठी आपल्या कडून उपलब्ध व्हावेत. तसेच कुंभार समाजाला गणपतीसाठी कायम स्वरूपी शासनाकडून सुरक्षित जागा मिळावी. कुंभार समाजातील ज्या काही लोकांचे प्रापंचिक साहित्याचे व गणपती मूर्तीचे नुकसान झाले आहे त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी. त्याचबरोबर पूर बाधित असलेल्या लोकांची सर्व व्यवस्था आपल्या कडून करण्यात यावी. याबाबतचे निवेदन आज निवासी जिल्हाधिकारी श्री. संजय तेली यांना देण्यात आले.
यावेळी हेमंत आराध्ये, संदीप कुंभार, अप्पा लाड, राजू मोरे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, राजसिंह शेळके, माधुरी नकाते, किरण नकाते, रोहित पोवार, अमर साठे, विशाल शिराळकर, आप्पा घरपणकर, अनिल कामत, रविकिरण गवळी, योगेश साळोखे, सयाजी आळवेकर, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, अमित पसारे, सचिन सुराणा, दिलीप बोंद्रे, योगेश कांगठाणी, अमेय भालकर ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.