*रुई येथील बंधाऱ्यामुळे उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी – माजी आमदार अमल महाडिक यांची मागणी*
कोल्हापूर
कोल्हापूरला महापुराने विळखा घातला आहे. विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत पाणी साठून राहिल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली ते रुई या प्रमुख जिल्हा मार्गावर रुई येथे बंधाऱ्यासाठी दोन्ही बाजूना मोठा भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी प्रवाहित होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
रुई बंधाऱ्याच्या भरावामुळे साचून राहिलेले हे पाणी गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, रुकडी, शिये, वडणगे, प्रयाग चिखलीसह कोल्हापूर शहर आणि पुलाची शिरोली इथल्या शेतीत आणि नागरी वस्त्यांमध्ये घुसून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. या सर्व नुकसानीची भरपाई देताना शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडतो.
रुई येथील बंधाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या बंधाऱ्यासाठी टाकलेला भराव न हटवल्यास भविष्यात उग्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.
या सर्व बाबींचा विचार करून रुई येथील बंधाऱ्यासाठी टाकण्यात आलेला भराव त्वरित हटवावा या मागणीचे निवेदन माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले.
या बंधाऱ्या जवळील भराव हटवल्यास पुराच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल आणि मोठी हानी टळेल. त्यामुळे युद्धपातळीवर यंत्रणा राबवून भराव हटवण्याचे काम सुरु करावे अशी मागणी महाडिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच यापुढे पुरक्षेत्रात विकासकामे करताना योग्य काळजी घ्यावी अशा सूचना महाडिक यांनी केल्या. यावर त्वरित उपाययोजना करू, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्याने दिले. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम उपस्थित होते.